खपली ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

दुपारची वेळ होती. ऊन चांगलंच भाजून काढत होतं. पाणंदीतून वर आल्यावर गावाच्या कच्च्या रस्त्यालगत असलेल्या डांबरी सडकेनजीक एस.टी. च्या थांब्यावर लिंबाच्या सावल्यांचा झिम्मा सुरु होता. मधूनच येणारी वाऱ्याची आल्हाददायक झुळूक गारवा जवळ आल्याची जाणीव करून देत होते. वर ऊंच आभाळात पाखरांचे खेळ सुरु होते, सूर मारून खाली येणारी घार नजरेच्या टप्प्यात येऊन गर्रर्रकन वळून पुन्हा झेप घेत होती, तिच्यामागे तिचा थवा घुमत होता. वाऱ्याचा जोर वाढला की पाखरं शांत होती आणि रस्त्याला लागून असलेल्या चिंचांच्या झाडाचा नाजूक पाला झड लागावी तसा पडत होता, ती पानझड पानविड्यातल्या गुंजपत्त्याची काळया मातीवर रांगॊळी काढल्यागत दिसत होती. इथं सडकेला वाहनांची वर्दळ कायम असते, भुर्रर्रकन जाणाऱ्या गाड्या आणि त्यात बसलेली रंगीबेरंगी कपड्यातली माणसं पाहताना वेळ कसा जातो ते काळत नाही. गावात मन लागलं नाही, घरी भांड्याला भांडं लागलं की इथल्या मैलाच्या दगडाला टेकून बसायचं, कुणाशीही न बोलता नुसतं निरखत राहिलं की आभाळ काळजात उतरतं. इथली लगबग पाहताना मनातला गाळ निवळत असल्यानं मुकाटयानं बसलेली माणसं हटकून दिसत होती. तर काही बोलघेवडी मंडळी चकाट्या पिटत होती. गावात येणारे जाणारे हौसे, गवसे, नवसे आणि अडली नडली मंडळी गाठ पडण्याचं हे सगळ्यात नेमकं ठिकाण असल्यानं रिकामटेकडी गुळाच्या ढेपेवर घोंगावणाऱ्या माशांगत दिसत होती. ज्यांना पार, देऊळ,चावडी कुठंच गोडी वाटत नसं ते जीव इथं रमत. त्यातलेच काही चेहरे सडकेच्या डाव्या बाजूस असलेल्या दामूअण्णाच्या हॉटेलात ओशाळभूतपणे बसून होते. स्टॅन्डजवळ एकाची वाट पाहत तिष्टत उभा होतो. सत्तरी पार केलेलं एक जोडपं एसटीतून उतरलं. त्यांच्या कपाळाला लावलेलं आडवं कुंकू घामानं पसरलेलं होतं. दोघंही चालताना गुडघ्यात वाकत होते. बहुधा तुळजापूरला जाऊन आलेले असावेत. अंग भाजून काढणाऱ्या उन्हाची त्या थकलेल्या जोडप्यास याची सवय नसणार. त्यांच्यात धूसफूस चालली होती. भांडणाच्या भरात खाली उतरले होते.दोघांतला संवाद लाह्या फुटाव्यात तसा सुरु होता."मी काय म्हणत होते, तिथंच अजून एखांदा मुक्काम केला असता ना".." आगं माझ्या लक्षात आलं नाही गं".."सारखं गाडीतनं चढउतार करून माझं गुडघं दुखताहेत, मला चालणं हुईनासं झालंय".."तुझी पिशवी देती का माझ्याकडे"...."हे सगळं असंच माझं मेलीच नशीबच फुटकं".... "अगं आपलं काय वाईट झालंय का"....."जन्मभर कशाची हौसमौज नाही की कुठली रसिकता नाही"..."आता द्येवद्येव करत फिरतोयच की आपण" ...."व्हय तर्र, इकडून तिकडं गाठोडं आवळून फिरतेय नव्हे का"...अगं हळू बोल गं लोकास्नी ऐकू जातंय, तुझ्याबद्दल वाईट वाटतंय पर मी तर काय करू ? तूच सांग बरं "..."का बरं हळू आवाजात बोलू ? त्येंच्या घरातबी भांड्याला भांडं लागतच असंल ना"..." ह्ये बग आपण असं करू.. पंढरपुरचा प्रवास उद्यावर ढकलू".. त्यांना थांबलेलं बघून कदमाचा सुन्या प्यासिंजर गाव्हल्याच्या खुशीनं आपलं जीपडं घेऊन तिथं आला आणि कुठंशीक जायचं म्हणून विचारू लागला. आपली तणतण न थांबवता त्याच्याकडं बघत म्हतारी बोलली - " आमाला तुजं जीपडं नको रे बाबा.. तू जा तपल्या वाटंनं.."" अगं असं नको गं रागराग करू"..."मंग करू तरी काय ? घरीदारी आजवर मन मारतच जगल्ये का न्हाय ?"...."कमी पडलो असंल गं.. पर माझी मजबूरी बी बघ की जरा... आता येईल ती गाडी धरू, मंग गाडीत बसल्यावर काय बोल लावायचेत ते लाव.."एव्हाना त्या म्हाताऱ्याच्या धुरकट डोळ्यात पाणी जमा झालेलं. लोकांच्या नजराही त्यांच्यावर खिळल्या होत्या. ती दोघंच देवदर्शनाला निघाली असावीत आणि वाटंनं भांडणतंटा सुरूच राहिल्यानं एकाएकी खाली उतरले असावेत. त्यांच्या गावाच्या सडकेला ही मन शांत करणारा असाच भवताल असावा. त्या ओढीनंच गाडीतून उतरल्याबरोबर त्यांनी लिंबाची सावली गाठली आणि वाहनांवर नजर ठेवून बसून राहिले. प्रवासाची सवय नसल्याने बाई पार शिणली होती. त्याच्या जोडीला आता आयुष्यभर दाबून ठेवलेल्या दुःखांचा कढ नको तिथं बाहेर आला होता. त्या माऊलीचा संताप अनावर झाला होता. ती थरथर कापत बोलत होती आणि तो थकलेला वृक्ष हताश होऊन तिच्याकडे पाहत होता. दोघांच्या हातातल्या पिशव्या आता रस्त्यावर विसावल्या होत्या.मनाचा हिय्या करत तो पुन्हा बोलता झाला, "मी काय मुद्दाम केलं का गं ?" ..."तुमी चुकला न्हाईत. चुकल्ये तर मी, इतके साल संसार केला. पर कधी कुठं तक्रार केली का ?"आता त्या माऊलीचा बांध फुटला. आजूबाजूला चोरट्या नजरेनं बघत भान राखून म्हातारा हळूच तिच्याजवळ गेला. म्हातारा पार पाखरागत झाला. बायकोच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत करावं असं त्याला लई वाटलं असणार पण त्याचं धाडस झालं नाही. भर रस्त्यात आडगावी तिला कसं समजावून सांगायचं हे त्यानं उमजत नव्हतं. तो आपला तिच्याजवळ बसून आभाळाकडं बघत होता. मघाशी आभाळातून खालीवर करणाऱ्या घारी आता खाली येत नव्हत्या, म्हाताऱ्याच्या फडफडणाऱ्या म्लान डोळ्यात उतरणारी निळाई गालावर आस्ते कदम पाझरु लागली होती.बऱ्याच वेळापासून त्यांच्या भांडणाकडं लक्ष देऊन असलेली रस्त्यावर डहाळं विकणारी शांताबाई कान देऊन ऐकत होती. चोरून निरखत होती. म्हाताऱ्याचे अश्रू बघून हात झटकत ती ताडकन उठली. त्या बाईंकडे ती गेली. ... "बाई तुजं सगळं खरंय पर तुजी जागा चुकली. धनी चुकलं म्हंत्येत नव्हं मग मोठ्या मानानं एक डाव माफ करून घरी जाऊन हिसाब मांडलेला बरा... जास्त ताणू नये बाई... माफ करायला वेळ लावला की जीव पस्तावतो.. नको वाढवू माय.. आपल्याच कारभाऱ्याची बेअब्रू करून काय होणार ?.. त्रास जसा तुम्हाला झाला असंल तसाच त्यांना पण झाला असंलच की... त्यांनी कुणावर राग काढावा बाई ?..." शांताबाईची मध्यस्थी गुणकारी ठरली. तिने भरल्या डोळ्यांनी दोघांचे एकमेकाच्या हातात दिले. दोघांना हायसं वाटलं. त्या स्पर्शानं त्यांचं दुःख परस्परांच्या काळजापर्यंत पोहोचतं केलं. त्यांना भरून आलं. तितक्यात पंढरपूरकडे जाणारी लालपिवळी एसटी आली आणि दोघंही पिशव्या उचलून गाडीत जाऊन बसले. गाडी निघाली आणि खिडकीतून बाहेर आलेल्या भेगाळलेल्या हातांनी शांताबाईचा निरोप घेतला.कंबरेत वाकलेल्या साठी पार झालेल्या शांताबाईचं कपाळ रिकामं आहे. कोरीव गोंदवलेलं पानफुल तिच्या काळ्या कपाळावर अजूनही उठून दिसत्ये. तिचा नवरा दारू पिऊन मारायचा तिला, तिच्या कमाईवर जगला आणि मेला. सगळं किडूक मिडूक नवऱ्याच्या दवाखान्यात तिनं विकून टाकलं. तिच्या एकुलत्या एक पोरीचा नवरा देखील दारुडा निघाला. तिचा अतोनात छळ करायचा तो. एकदा रागाच्या भरात शांताबाईनं त्याच्या डोक्यात कुदळ घातली. त्याचं काम तमाम केलं. बाईमाणसानं केलेला तो तालुक्यातला पहिला खुन होता ! साक्षीपुराव्याअभावी सेशन्स कोर्टात ती निर्दोष सुटली. पण तिच्या आयुष्याला एक सल लागली, आईमुळं विधवा झाली म्हणून पोरगी तिलाच दोष देत राहिली पण पोरीच्या आयुष्याची कीड गेली या शांताबाई समाधानी आहे. लंकेची पार्वती होऊन रस्त्यावर माळवं विकत बसते आणि त्यावर आयुष्य कंठते. एकटीच राहते आणि घासातला घास चार जणांना देते. तिच्याकडं जगण्याच्या विविध समस्यांवर तोडगे आहेत कही काळे आहेत तर काही पांढरे आहेत. आतादेखील तिनं या दोघातला वाद सहज सोडवला. ते दोघं गेल्यानंतर मात्र बराच वेळ ती पाडस हरवलेल्या हरिणीसारखी कासावीस होऊन बसून होती.त्या दिवशी घरी गेल्यावर शांताबाई पार उन्मळून पडली. तिला गुराप्रमाणे मारझोड करणाऱ्या नवऱ्याने तिच्यावर कधी जीव लावला नव्हता की कधी साधं प्रेमदेखील केलं नव्हतं. मरताना अखेरच्या क्षणी मात्र त्याने तिची क्षमायाचना केली, तिची माफी मागितली. त्याचं बोलून झाल्यावर शांताबाईला बोलायचं होतं, त्याला माफ केल्याचं सांगायचं होतं पण तिने काही बोलण्याआधीच त्याचे श्वास थांबले होते. आपलं बोलणं राहून गेलं या गोष्टीची खंत तिला कधीच स्वस्थ बसू देत नव्हती. जोडप्याच्या भांडणातनं तिच्या जुन्या जखमेची खपली निघाली आणि त्यातून रक्ताऐवजी भळाभळा अश्रू वाहू लागले.- समीर गायकवाड.  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!