कुलकर्णी काकांच्या मिश्किल आठवणी - विशेष लेख.

By jyubedatamboli on from https://jyubedatamboli.blogspot.com

 कुलकर्णी काकांच्या मिश्किल आठवणी - विशेष लेखलेखिका: डॉ. ज्युबेदा तांबोळीफोटो साभार: गूगल       आमच्या परसदारी शेवग्याचे झाड होते. आषाढ महिन्यात शेवग्याची पालेभाजी खावी असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे स्वातीकाकी आणि सासूबाईनी शेवग्याची भाजी काढून करायला सुरुवात केली. दोन-तीन वेळा सर्वांनी आवडीने भाजी खाल्ली. चौथ्यांदा शेवग्याची भाजी समोर येताच काका काकीना म्हणाले, "आम्हाला काय शेळ्या-मेंढ्या समजलात की काय, शेवग्याची भाजी ओरबडून काढता आणि आमच्या समोर ठेवता". सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली.       एकदा मी आजारी होते. औषधोपचार करूनही तब्येत बरी होत नव्हती म्हणून मी आमच्या साहेबांना म्हणाले, "माझं कांही खरं नाही. ही पासबुकं, विमा पॉलिसीज इथं एकत्र ठेवल्या आहेत, त्या तुमच्या ताब्यात घेऊन ठेवा." काकांनी दरवाज्याच्या पलीकडून माझे बोलणे ऐकले व मोठ्याने म्हणाले, "भाभी, शेजारी या नात्याने आमच्यासाठी पण कांहीतरी ठेवता की नाही? आत्ताच सांगून ठेवा." आजारी असतानाही मी मोठमोठ्याने हसू लागले.       काका दर पौर्णिमेला न चुकता नरसोबाच्यावाडीला दत्तदर्शनाला जायचे येतांना प्रसाद म्हणून तिथले सुप्रसिद्ध पेढे आणायचे. आमच्या छोट्या मुलीला यास्मिनला ते पेढे फार आवडायचे. काका वाडीला गेलेत हे समजताच त्यांच्याकडे पेढे मागायची. एकदा मी तिला दटावत म्हटलं, "असं काही मागायचं नसतं, दिलं तरी नको म्हणायचं असतं." नंतर काकांनी तिला पेढा देतांना ती नको म्हणाली. ती त्यावेळी तीन वर्षांची होती. काका मला म्हणाले, "काय सांगून ठेवलयं भाभी?" मी म्हणाले, "कांही नाही." काका म्हणाले, "काही नाही म्हणू नका. तुम्ही ज्या शाळेत शिकलात ना त्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो. परत तिला असं सांगू नका प्रसाद लहान मुलांनी खायचा नाही तर कुणी खायचा." मी बिचारी गप्पच बसले.       काकांच्या स्कूटरवरून एकदा कार्यक्रमासाठी निघाले होते. एक मोटरसायकलवाला राँग साईडने समोरच आला. प्रसंगावधानी काकांनी जोरात ब्रेक दाबला व त्याला म्हणाले, "घरी सांगून आलाय का?" भांबावलेला तो मनुष्य म्हणाला, "नाही हो, काय सांगून यायचं  असतं". काका म्हणाले, "भावा, वर जातो म्हणून सांगून यायचं आणि मग अशा प्रकारे गाडी चालवायची." तो खाली मान घालून सॉरी म्हणून निघून गेला.       आमच्या साहेबांच्यासाठी एम्.8० गाडी खरेदी करायची होती. नेहमीप्रमाणे गाडी खरेदीला काका बरोबर होतेच. मी यांना सांगितलं होतं की गाडी लाल रंगाचीच आणा. त्यावेळी लाल रंगाची गाडी शोरूम मध्ये उपलब्ध नव्हती. काका यांना म्हणाले, "रंगाचं काय घेऊन बसलात, ग्रे कलरची घेऊन टाका आज मार्गशीर्ष गुरूवार आहे. मी सांगतो भाभीनां काय सांगायचं ते." गाडी घरी आली मी म्हटलं, "लाल रंगाची गाडी आणा म्हणून सांगितलं होतं ना?" काका म्हणाले, "हा कलरही सुंदर आहे भाभी. कांहीं दिवसांनी तुम्हाला हाच कलर आवडू लागेल. आता माझंच बघा ना, स्वाती लग्नाच्या वेळी मला अगदी मनापासून पसंत नव्हती पण पदरात पडली नि पवित्र झाली. आता स्वाती मला फारच आवडू लागलीय बघताय ना तुम्ही". यावर मी काय बोलणार?       आज सव्वीस वर्षे झाली, गाडी फारच आवडते यांना. दुसऱ्या दोन-तीन गाड्या घेतल्या आहेत पण तिला विकले नाही. ती फारच लाडकी व आवडती गाडी आहे यांची.       एखाद्याला सहकार्य करणे हा तर काकांचा स्थायीभाव. आमच्या साहेबांना सब-रजिस्टार पदावर प्रमोशन मिळाले. त्यांना कागल जि. कोल्हापूर येथे हजर व्हायचे होते. नेहमीप्रमाणे ते एस्. टी. महामंडळाच्या गाडीने जाणार होते. दुसऱ्या दिवशी काका जाण्याच्या वेळेपेक्षा आधीच तयार झाले. यांना म्हणाले, "साहेब, आवरा लवकर मी तुम्हाला सोडायला येणार आहे. मी रजा घेऊन आलो आहे." आम्हाला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. काका म्हणाले, "माझ्या मित्राला एवढं मोठ्ठ प्रमोशन मिळालय तो एकटा कसा जाणार? आपली ओळख आपणच कशी करून देणार?" काका यांना घेऊन गेले. सर्वांना ओळख करून दिली व संध्याकाळी घेऊन आले व सासूबाईना म्हणाले, "दादीजी, तुम्हारे बेटेको ऐसे लेके गया और वापस लेके आया, पेटमें का पानी भी हिला नही होगा."        असे हे परोपकारी, शिस्तप्रिय, मनमिळाऊ, हजरजबाबी आणि प्रसंगावधानी काका. तुम्हाला विसरणे अगदीच कठीण!
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!