कुंपणापलीकडच्या जगात

By ramataram on from https://vechitchaalalo.blogspot.com

Ali & The Ball, Short Film from Simon NJOO ASE on Vimeo.मुलांचा फुटबॉलचा खेळ रंगात आला आहे. प्रचंड कोलाहल, आरडाओरड्याने त्यांनी आसमंत दणाणून सोडला आहे.कॅमेराही त्यांच्या मधे धावणार्‍या त्या चेंडूचा पाठलाग करू पाहतो, पण जमत नाही त्याला. इतक्यात एक बदामी डोळ्याचा खट्याळ पोरगा तो चेंडू उचलून धूम ठोकतो. उरलेली सारी मुले त्याच्या मागे लागतात. पण तो फार दूर जाऊ शकत नाही, एक भक्कम कुंपण त्याच्या वाटेत उभे आहे. त्या कुंपणाला पाठ लावून तो चेंडू नेण्यासाठी आलेल्या त्या मुलांना चिडवतो आहे. ते ही सगळे मिळून त्याच्यावर धावून जातात नि चेंडू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताहेत. हात उंच करून तो चेंडू त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.अखेर संख्याबळासमोर त्याचा निरुपाय होतो. पण तो ही तसा हार जाणारा नाही. आपल्याकडून चेंडू हिसकावून घेतल्याचे श्रेय त्या मुलांना द्यायची त्याची तयारी नाही. तेव्हा तो चेंडू दूरवर फेकून देऊन तो त्यांचा तो मनसुबा धुळीस मिळवू पाहतो. पण तो चेंडू फेकण्याचा पवित्रा घ्यायला नि काही मुलांच्या धसमुसळेपणाने त्याची दिशा बदलायला एक गाठ पडते. चेंडू मुलांच्या मागे फेकला जाण्याऐवजी कुंपणावरून पलिकडे फेकला जातो. सारा कोलाहल अचानक स्तब्ध होतो. आसमंतात कुठे पान जरी हलले तरी त्याचा आवाज घुमावा इतकी भयाण शांतता पसरते. सर्व मुले तीव्र नजरेने त्या मुलाकडे पाहू लागतात. त्यांच्या चेहर्‍यावर एकाच वेळी निराशा आणि संताप यांचे मिश्रण दिसते. हळूहळू एक एक करून ती मुले तिथून काढता पाय घेतात. जाताजाता मागे वळून पुन्हापुन्हा ते त्या मुलाकडे तीव्र नजरेने पहात त्याला त्याच्या घोर अपराधाची जाणीव करून देतात.कॅमेरा चेंडूचा नि मुलांचा पाठलाग करत असताना पार्श्वभूमीवर अनेक लहान लहान तपशील पकडत जातो, खेळाच्या नि त्यामुळे आलेल्या दृश्यमालिकेच्या वेगात चटकन ध्यानात न येणारे. ज्या जमिनीवरून तो चेंडू नि ती मुले धावताहेत ती जमीन वांझ, रेताड आहे, त्या मुलांना फुटबॉल खेळता यावा म्हणून तिथे वर्षभर जोपासून वाढवलेली हिरवळ नाही. खेळणार्‍या सार्‍याच मुलांच्या पायात शूज दिसत नाहीत, त्यातली काही चप्पल, सपाता घालून खेळताहेत, तर काही त्या तप्त रेताड जमीनीवर अनवाणीच धावताहेत. भिंतीजवळ एक गादी रस्त्यातच आडव्या झालेल्या मद्यपीसारखी वेडीवाकडी पसरलेली दिसते. अधेमधे पांढर्‍या प्लास्टिकच्या खुर्च्यांची रांग दिसते. एका रांगेत त्यावर ओळीने बसून या मुलांचा खेळ पाहणारे पुरुष दिसतात. कुठे नुसत्याच रिकाम्या खुर्च्या दिसतात. खुर्च्या पांढर्‍या, त्या पाठीमागच्या भिंतीही पांढर्‍या; जणू त्या जगात तो एकच रंग व्यापून राहिलेला. त्या भिंतींमधून एखाद्या काडेपेटीतून कापून काढाव्यात तशा खिडक्या, त्यावर बांधलेल्या दोर्‍यांवर वाळत घातलेले कपडे, क्वचित एखादी खिडकी एखादा कपडा लावून संपूर्ण झाकून टाकलेली (कदाचित उन्हाचा ताप आत होऊ नये म्हणून) 'चेंडू कुंपणाआड गेला तर त्यात काय मोठेसे, पलिकडे जाऊन घेऊन यावा. किंवा तूर्तास दुसरा काही खेळ खेळावा. यात एवढं नाराज होण्यासारखं नि त्या बिचार्‍याने जणू काय कुणाचा खूनच केलाय अशा तर्‍हेने त्याच्याशी वागण्याचं काय कारण?' सुखवस्तू शहरी जीवनात वाढलेल्यांना असा प्रश्न एव्हाना पडला असेल. यात दोन महत्त्वाची गृहितके आहेत. एक हवे तेव्हा कुंपण ओलांडून जाण्याचे स्वातंत्र्य त्या मुलांना आहे. मुलांना खेळण्यासाठी एकाहुन अधिक पर्याय नेहमीच उपलब्ध असतात हे दुसरे. 'अली अँड द बॉल' हा छोटेखानी चित्रपट आपल्या या गृहितकांपलिकडे अस्तित्वात असलेल्या जगाबद्दल सांगतो आहे. जगात अनेक कुंपणे अशी असतात जी ओलांडण्याची आपल्याला परवानगी नसते, तेवढे स्वातंत्र्य आपल्याला नेहमीच असते असे नाही. दुसरे असे की जगण्याचे हजारो पर्याय जगात असतील पण त्यातले सारे प्रत्येकाला उपलब्ध असतीलच असे नाही. जगात काही जीव असेही असतात ज्यांचे जगण्याचे आभाळ अतिशय भक्कम कुंपणांनी बंदिस्त केलेले असते, जगण्याचे बहुतेक पर्याय त्यांच्यापासून हिरावून घेतले जातात. तर मुलाचे नाव अली. खरंतर त्याचं नाव 'अली'च का, 'अब्राहाम', 'जॉन' किंवा 'ज्ञानेश्वर' असायलाही काही हरकत नाही. पण चित्रपटाचे शीर्षक 'अली अँड द बॉल' असल्यामुळे याचे नाव अली. (या एक कारण चित्रपटाची विशिष्ट पार्श्वभूमी देखील आहे.) तसं पाहता या जेमतेम १५ मिनिटाच्या चित्रपटात एखाद दुसरे वाक्य वगळले तर संवाद नाहीतच. कुंपणापलिकडचे नि कुंपणाअलिकडचे यांच्या भाषेत, संस्कृतीत तसाही फरक असेलच ना. मग संवाद घडावा कसा? पण अगदी कुंपणाआडच्या लोकात आपसातही फारसा संवाद नाही. अलीआणि त्याची बहीण वा त्याची आई यांच्यात शाब्दिक संवाद अगदी थोडा आहे. शब्द गोठून गेलेले ते जिणे. ते बोलतात ते त्यांच्या भाषेत (अरेबिक?) तुम्हा-आम्हा प्रेक्षकांना ते समजत नाही. परंतु मुद्दा हाच आहे की कुंपणाच्या अलिकडे असलेल्यांना त्या कुंपणात बंदिस्त केलेल्यांची भाषा समजत नाही, मने समजणे तर दूरच राहिले. त्या अर्थी चित्रपटातील ते संवाद इंग्रजीत रुपांतरित न करणे अथवा कोणत्याही सब-टायटल्सची जोड देणे टाळणे हे अतिशय सयुक्तिक आहे नि त्याबद्दल दिग्दर्शक तुमची दाद घेऊन जातो. चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेता दिग्दर्शकाने पार्श्वसंगीताचा वापर अतिशय मर्यादित ठेवला आहे. 'शब्देविण संवादु' हाच चित्रपटाचा केंद्रबिंदू असल्याने हा निर्णयही अगदी समर्पकच म्हणावा लागेल.अलीकडे तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकत सारी मुले निघून जातात. कुंपणाजवळ उभा असलेला नि मित्रांकडून धिक्कारला गेलेला अली हताशपणे कुंपणापलिकडच्या चेंडूकडे नजर टाकतो. कुंपणाच्या आतून अलीला दिसते ते बाहेरचे वाळवंट, चार खुरट्या झुडपांखेरीज जिवंतपणाची कोणतीही खूण न दाखवणारे. त्याच्या पलिकडे त्यालाही एकप्रकारे कुंपणात बंदिस्त करणारी डोंगरांची एक रांग.आता पडद्यावर दिसतात एका तरुण स्त्रीचे हात, विणकामाच्या सुया घेऊन लाल लोकरीचे विणकाम करणारे. ही आहे अलीची आई, केसाची बटही बाहेर दिसू नये अशा तर्‍हेने मुस्लिम पद्धतीने स्कार्फ परिधान केलेली. एका लहानशा खोलीत ती विणकाम करत बसलेली आहे. ती बसलेली आहे ती जमिनीवरच अंथरलेल्या एका गादीवर, त्याच्या बाजूला जेमतेम दीड-दोन फुटाचे तीन खणी कपाट, त्यावर फिरणारा एक टेबल फॅन, एक पाण्याची बाटली आणि लॉन्ड्री बास्केट. बस्स सार्‍या खोलीतली मिळकत म्हणावी ती इतकीच. तिच्यासमोर जमिनीवरच पालथा पडून एका कागदावर अली काहीतरी खरडतो आहे. इतक्यात आई त्याला हाक मारते नि आतापावेतो झालेले विणकाम त्याच्या समोर धरून मापाचा अंदाज घेते. माप योग्य असल्याचे पाहून अली हलकेसे स्मित करून आपली पसंती देतो. ती ही समाधानाने हसते नि पुन्हा मागे सरकून भिंतीला टेकून बसते. दोघांच्याही चेहर्‍यावरचे हास्य लगेचच लोपले आहे. ती बाजूची पाण्याची बाटली उचलून थोडे पाणी प्यावे यासाठी झाकण उघडते. पण बाटली अर्ध्याहुन थोडी कमीच भरलेली दिसते. एक क्षणभर थांबून ती प्रथम अलीला पाणी पिण्यास सुचवते. प्रथम तो नकार देतो. पण ती पुन्हा एकवार बाटली त्याच्या हाती देते. तो ही उगाच थोडे प्याले न प्याल्यासारखे करून बाटली तिला परत देतो. ती ही थोडे पाणी पिऊन बाटली त्याच्याकडे परत देते. अली ती बाटली घेऊन बाहेर येतो. आता तो ज्या वस्तीत राहतो ती आपल्याला दिसू लागते. काड्याच्या पेटीसारखी चौकोनी ठोकळे असलेली घरे, खरंतर मालवाहतुकीच्या कंटेनरसारखी. आज आहेत उद्या असतीला का याबाबत खात्री न देणारी. सर्व खोक्यांना A1, A2 ... असे नंबर दिलेले. प्रत्येक खोलीच्या बाहेर एकेक प्लास्टिकची खुर्ची, खिडकीवरच एखादी दोरी बांधून वाळत घातलेले कपडे, दोन घरांच्या मधे सोडलेल्या वाटेवर या खुर्च्यांवर किंवा सरळ चवड्यावर बसून विड्या फुंकत किंवा चिंताग्रस्त चेहर्‍याने नुसतेच बसलेले आबालवृद्ध. या सार्‍यांना ओलांडून अली कुंपणाजवळ येतो. तिथे त्याची धाकटी बहीण शून्य मनाने बसलेली दिसते. तो तिला पाण्याची बाटली देऊ करतो. ती नकार देते. अखेर तो ही तिच्या शेजारी बसतो. तिचे लक्ष खिळून राहिले आहे ते त्या कुंपणापलिकडील चेंडूवर. त्यानेच तो तिकडे फेकला आहे नि तो सार्‍या मित्रांच्या रोषाचा धनी झालेला आहे. त्याची ती छोटी बहीण कदाचित त्या फुटबॉलच्या खेळात सामीलही होत नसावी, पण मुलांना फुटबॉल खेळताना पाहणे हा तिचाही विरंगुळा होता. तो देखील अलीमुळेच हिरावला गेला असल्याने ती ही त्याच्यावर रुसली आहे. आता संध्याकाळ झाली आहे. अली नि त्याची बहीण आपल्या खोलीत परतले आहेत. तो तिला झोपवायचा प्रयत्न करतो आहे. पण ती अजूनही जागी आहे. झोपण्यास तिचा ठाम नकार आहे. तिची समजून घालण्याचे त्याचे सारे प्रयत्न अयशस्वी झालेत. इकडे त्याची आई दिवसभराचे विणकाम आता सोडवू लागली आहे. बहिणीला झोपवण्याचा नाद सोडून आता तो आईच्या मदतीला येतो. तिने सोडवलेली लोकर तो नीट गुंडाळून ठेवण्यास तिला मदत करतो आहे. आता दोघांच्याही चेहर्‍यावर सकाळच्या स्मिताचा मागमूस नाही. तो फक्त एकदाच हळूच तिच्याकडे पाहतो, पण ती त्याच्या नजरेला नजर न देता मनातले उसळून येऊ पाहणारे काही दाबून धरल्यामुळे क्षुब्ध झालेल्या चेहर्‍याने भराभरा विणलेली लोकर मोकळी करते आहे. फुरंगटून बसलेली छोटी अजूनही झोपेचे नाव घेत नाहीये. अलीच्या कुंपणाआडच्या जगातला आणखी एक दिवस संपतो आणि नेहमीच्या दिवसाप्रमाणेच नेहमीची रात्र सुरू होते.सकाळ उजाडते. फुटबॉल नसल्याने खेळायला काहीच नसल्याने निरुद्देश भटकणार्‍या अलीला अचानक रेताड जमिनीतून उगवून आलेला एक लहानसा अंकुर दिसतो. जिवंतपणाची कोणतीही खूण न दिसणार्‍या त्या जगात या अंकुराचे येणे त्याच्या दृष्टीने अर्थातच अप्रूपाचे असते. अतिशय हळुवारपणे बोटाने स्पर्श करून तो जिवंतपणा तो अनुभवू पाहतो. ती छोटीही त्याच्याबरोबर असते. इतक्यात घंटा वाजते (कदाचित ही त्या वस्तीत राहणार्‍यांना आपापल्या खोल्यांमधे परतण्याची वेळ झाल्याचा संकेत देते.) ती ऐकून अलीआपल्या बहिणीला आपल्याबरोबर नेण्यासाठी उठवू लागतो. ती हट्टी,अजूनही तिचा त्याच्यावरचा राग गेलेला नाही. ती तिथेच कुंपणाजवळ ठिय्या देऊन बसून राहते. तिची समजून काढत असतानाच कुंपणापलिकडे एक कारचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आल्याने त्याचे लक्ष तिकडे वेधले जाते. त्यातून एक पुरुष बाहेर पडतो नि वस्तीच्या मुख्य दाराच्या दिशेने निघून जातो. पण अलीचे लक्ष लागले आहे ते त्या कारमधेच बसून राहिलेल्या मुलीकडे. ही मुलगी साधारण त्याच्याच वयाची. कदाचित तिला कारमधेच बसून राहण्याची 'आज्ञा' झाली असल्याने (थोडक्यात बाहेरच्या तथाकथित ’स्वतंत्र’ जगात तिची वेगळ्या स्वरूपातली कुंपणे आहेतच.) आणि तिथे बसल्या बसल्या फारसे काहीच करता येत नसल्याने निरुद्देशपणे चाळा म्हणून त्या गाडीच्या दारावर बोटानेच काहीतरी गिरवत बसलेली. इतक्यात तिलाही कुंपणापलिकडे काही हालचाल दिसते, समोर अली आणि त्याच्या बहीणीला पाहून ती अभिवादनाचे स्मित करते. या नव्या पाहुण्याकडे अली कुतूहलाने नि निरखून पाहतो आहे. अर्थात त्यांच्या फारसा संवाद होत नाहीच. इतक्यात आत गेलेला पुरुष एका स्त्रीसह बाहेर येतो नि गाडी - नि तिच्याबरोबर त्या छोट्या मुलीलाही - घेऊन निघून जातो. अलीच्या कुंपणाआडच्या जगातला आणखी एक दिवस संपतो आणि नेहमीच्या दिवसाप्रमाणेच नेहमीची रात्र सुरू होते.त्या रात्री त्याला जाग येते ती वस्तीत अचानक चालू झालेल्या प्रचंड गदारोळामुळे. धावत बाहेर येऊन पाहतो तो एका पुरुषाला वस्तीचे सुरक्षा-रक्षक धरून नेताना दिसतात. त्याची छाती अनेक वारांनी रक्तबंबाळ झालेली दिसते. अर्थात हे वार कुठल्या प्राणघातक हत्याराचे दिसत नाही एखाद्या छोट्या ब्लेडने किंवा तत्सम छोट्या हत्याराने आठ - दहा वार केलेले दिसतात. जखमा खोल नसाव्यात पण संख्येमुळे वेदना अधिक जाणवत असावी. (गोल टोपी घातलेला हा पुरुष यापूर्वी आपण एका खोलीसमोर चवड्यावर बसून सिग्रेट फुंकत बसलेला आपण पाहिला होता.) तिथे चाललेल्या गदारोळातून त्याच्यावर कुणी हल्ला केला की त्यानेच त्या भयाण शून्यवत आयुष्याचा उबग येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हे नक्की समजत नाही. परंतु त्या गदारोळातून ऐकू आलेल्या 'कात्री... कात्रीने जखमा...' एवढेच काय ते सुसंगतपणे ऐकू येते. त्या तसल्या नास्तित्वाच्या जिण्यामधे दोन व्यक्तीमधे असे काय घडणे शक्य आहे की ज्यातून एकाने दुसर्‍यावर हल्ला करावा? 'रिकामे डोके सैतानाचे घर' या न्यायाने कुठल्याशा दूरच्या, मागे सोडून आलेल्या आयुष्यातील देण्याघेण्याच्या वा अस्मितांच्या मुद्द्यांवर डोकी भडकली होती की जिथे एक बाटली पाणी देखील पुरवून प्यावे लागते तिथे एरवी अतिशय फुटकळ भासणार्‍या पण त्या परिस्थितीत सोन्याचे मोल असणार्‍या एखाद्या वस्तूच्या स्वामित्वावरून त्यांची जुंपली असेल? दिग्दर्शक या प्रश्नांची उत्तरे तुमच्यावरच सोपवतो किंवा घटनेपेक्षा परिणाम अधिक महत्त्वाचा हे समजून घ्यावे अशी अपेक्षा धरतो. तसंही जगात सगळ्याच प्रश्नांची निश्चित उत्तरे कुठं मिळतात, तसं असतं तर 'अलीच्या कुटुंबाचं नि त्यांच्यासारख्या इतरांचं जग असं कुंपणाआड बंदिस्त का केलं गेलंय? कोणत्याही मालकाच्या नावाची मोहोर घेऊन न जन्मलेल्या भूमीवर त्यांना असं बंदिस्त करण्याचा अधिकार त्या कुंपण बांधणार्‍यांना कुणी दिला?' या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवी होती. पण हे आणि यासारखे प्रश्न कायम अनुत्तरितच राहतात.ते भयानक दृश्य पाहून अली चटकन आपल्या पाठोपाठ आलेल्या छोट्या बहिणीचे डोळे आपल्या हाताच्या तळव्याने झाकून घेतो. घरातला तो एकच 'पुरुष' आहे. घरच्या परावलंबी आणि उघड्यावर पडलेल्या स्त्रियांची, त्यांच्या हिताऽहिताची जबाबदारी आपली आहे, आयुष्यातील सार्‍या विपदांपासून, विदारकतेपासून त्यांना दूर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे हे त्या आठ वर्षांच्या मुलाला आताच जाणवले आहे. दुसरा दिवस उजाडतो. अली पुन्हा एकवर छोटीला घेऊन कुंपणाकडे येतो. कालची ती मोटार आजही येऊन थांबली आहे. तो त्या मोटारीसाठीच तिथे आला आहे तर त्यातील ती मुलगीही जणू त्याचीच वाट पहात असावी असे दिसते. त्या बाहेर पडलेल्या चेंडूकडे बोट दाखवून तो आपल्याकडे फेकावा अशी विनंती करणार्‍या खाणाखुणा त्या मुलीला करतो. मुलगी आधी खिडकीतून वाकून मुख्या दाराकडे नजर टाकते (तिलाही 'कारच्या बाहेर पाऊल न टाकण्याचे ’कुंपण’ आहेच) दरवाजा उघडून बाहेर येते चालत चालत चेंडूपर्यंत पोचते नि चेंडू उचलून हातात घेते. अलीच्या चेहर्‍यावर स्मित उमलते. इतक्यात दरवाजाकडून त्या मुलीच्या नावे हाक येते. दचकून ती चेंडू खाली टाकते नि धावत कार गाठते. आतून एका स्त्रीला - बहुधा त्या मुलीची आई नि त्या वस्तीवरल्या माणसांच्या आरोग्य-तपासणीसाठी येणारी डॉक्टर? - घेऊन आलेला सुरक्षा-अधिकारी तिला 'त्या' मुलाकडे बोट दाखवून काही विचारतो आहे. आणि बहुधा त्याच्याशी न बोलण्याची तंबी देतो आहे. कुंपणापलिकडची ती मुलगी कारमधून भुर्रकन निघून जाताना कुंपणाआडचा अली हताशपणे पहात राहतो. कालच्या प्रसंगांनंतर आता सुरक्षा-अधिकारी सार्‍या खोल्यांची तपासणी सुरू करतात. ज्याने इतरांना वा स्वत:ला इजा करता येऊ शकेल असे सारे काही ते जप्त करू लागतात. यात प्रामुख्याने कात्र्या, ब्लेड यासारखी धारदार हत्यारे, याशिवाय पॅंट्सचे बेल्ट वगैरे रोजच्या आवश्यक अशा गोष्टी ’खबरदारीची उपाययोजना' जमा केल्या जात आहेत. त्यांना इतर खोल्यातून हे सारे जप्त करताना पाहून अली त्याच्या खोलीकडे धावतो. विणकाम करीत बसलेल्या आईच्या हातातील विणकाम हिसकावून घेऊन ते लपवून ठेवण्याची त्याची धडपड चालू होते. पण त्याच्या आईला त्याचा हेतू लक्षात येत नाही. आयुष्यातला एकमेव विरंगुळा तो हिरावून घेतोय या भावनेतून प्रतिक्षिप्त क्रियेने ती त्याला विरोध करू पाहते. या सार्‍या झटापटीत काही क्षण वाया जातात नि ते सुरक्षा-रक्षक त्यांच्या खोलीपाशी पोहोचतात. तिच्या हातून विणकामाचे साहित्य हिसकावून घेऊन त्यातील विणकामाच्या सुया तेवढ्या काढून घेतात. ते तसे करतील हा अलीचा तर्क अचूक ठरतो, परंतु ते टाळण्याचा प्रयत्न विफल ठरतो. तो सुरक्षा-अधिकार्‍यारी सुया काढून लोकर तेवढी त्याच्या आईला परत देऊ पाहतोय. पण तिचा हात पुढे येत नाही. सुयांविना त्या लोकरीचा तिला तसाही काही उपयोग नाही. शिवाय जगण्यातले एकमेव असे काही हिरावले गेल्यानंतर ’उद्या’च्या चिंतेने ती हतबुद्ध होऊन बसली आहे. ती लोकर तिच्या हाती ठेवून निघताना तो अधिकारी दारात क्षणभर थांबतो, वळून तिच्याकडे पाहतो. क्षणभरच त्याच्या डोळ्यात कणव दिसते, झटकन मागे वळून खांदे पाडून तो निघून जातो. कुंपण घालणारी माणसे केवळ तुम्हाला कुंपणाच्या आत बंद करूनच शांत होत नाहीत, त्या मर्यादित अवकाशातही तुम्ही कसे वागावे, काय करावे याचे काटेकोर नियम घालून देतात, तुमच्या संचार-स्वातंत्र्यापाठोपाठ आचार-स्वातंत्र्यही हिरावून घेतात. काही कुंपण उभारणारे आणखी लबाड असतात, ते तुमचा इतका सफाईने बुद्धिभेद करतात की ते कुंपण आपल्याच संरक्षणासाठी बांधलेला कोट आहे असा तुमचा समज होऊन त्याबद्दल निषेध करण्याऐवजी तुम्ही उलट त्यांचे उतराई होऊ पाहता. बांदेकरांची ’उंच डोंगरावर घर बांधून राहिलेली माणसे'१ किंवा 'पर्वतापलिकडील सम्राटाचे आदेश'२ आणणारा जीएंच्या 'कळसूत्र'मधला कथेतला नेता हे त्या कुंपणांना आणखी अदृश्य पण भक्कम पायाची जोड देतात. अली कुंपणाकडे धाव घेतो. कुंपणापल्याड झाडाच्या एक दोन वाळक्या फांद्या त्याला दिसतात. वस्तीवर कुठूनतरी पैदा करून आणलेल्या एका पुठ्ठ्याच्या तुकड्याला त्याने अरुंद पण लांब अशा तुकड्यात कापले आहे. त्या कुंपणाच्या तारांमधून पलिकडे जाऊ शकेल असा हा तुकडा त्यातून पार करून त्याच्या सहाय्याने हळूहळू ओढत ओढत तो त्यातील एक फांदी आत ओढून घेण्यात यशस्वी होतो. अतिशय आनंदाने धावत जाऊन तो जवळच्या एका खोलीजवळ तयार खोल्यांच्या तळाला आधार म्हणून आणलेल्या पण आता सुट्या पडलेल्या एका सिमेंटच्या ठोकळ्यावर घासून घासून तो त्यांच्या दोन 'सुया' तयार करतो. त्या घेऊन तो आईला त्याच्या सहाय्याने विणकाम करण्याचे शिकवू पाहतो. ती फांदी अर्थातच सुयांपेक्षा जाड असते आणि खरखरीतही. त्यामुळे विणकामात तितकी सफाई अर्थातच येत नाही. आपल्या मुलाची ही धडपड पाहून आतापावेतो शून्यमनस्क दिसणारी त्याची आई प्रथमच वैफल्याने आणि क्लेषाने विकल होऊन जाते. अलीच्या कुंपणाआडच्या जगातला आणखी एक दिवस संपतो आणि नेहमीच्या दिवसाप्रमाणेच नेहमीची रात्र सुरू होते.दुसरा दिवस उजाडतो. कार येण्याची वेळ झालेली असल्याने अली पुन्हा एकवार प्रयत्न करण्याच्या हेतूने कुंपणाजवळ येतो. गाडीतील ती मुलगी खिडकीतून डोकावून याची जणू वाटच पहात असते. त्याला पाहिल्याक्षणी तिचा चेहरा उजळतो. जणू काल पुरे करू न शकलेले त्याचे काम आज पुरे करण्याच्या निर्धारानेच ती आलेली दिसते. तिला पाहताच तो ओळखीचे स्मित करतो नि हात हलवून अभिवादन करतो. तीही त्याचे प्रतिअभिवादन करून त्याला प्रतिसाद देते. एक क्षणच दोघे एकमेकाकडे पाहतात नि दोघांचेही लक्ष एकदमच त्या चेंडूकडे वळते. ती मुलगी आज तयारीने आली आहे. दाराकडे पाहून ती कानोसा घेते, एका झटक्यात कारचे दार उघडून त्या चेंडूकडे धाव घेते. तितक्याच झटपट तो चेंडू कुंपणावरून पलिकडे फेकते नि वेगाने परत जाऊन कारमधे बसते. तीन-चार दिवस काळवंडून गेलेला त्याचा चेहरा प्रथमच उजळतो नि त्याच्या चेहर्‍यावर निर्भय हास्य उमलते. अलीच्या कुंपणाआडच्या जगातला आणखी एक दिवस संपतो आणि नेहमीच्या दिवसाप्रमाणेच नेहमीची रात्र सुरू होते.त्या रात्री अली पुन्हा एकवार जागा होतो तो त्याच्या आईच्या रडण्याने. दिवसभर दोन छोट्या मुलांसमोर तिची सारी घुसमट, सारी वेदना तिने मनाच्या तळात खोल चिणून टाकलेली असते. रात्र पडताच ती उसळून वर येते. इथे मात्र त्याच्याकडे काही उपाय नाही. हताश होऊन तो उशीखाली डोके दाबून तिचे हुंदके ऐकू येऊ नयेत याचा प्रयत्न करत राहतो. पण तिचे हुंदके त्याच्या कानावर पडतच राहतात. पुनर्लाभ झालेला तो चेंडू तो आपल्या जवळच घेऊन झोपला आहे. त्याच्याकडे नजर जाताच त्याच्या विचाराची चक्रे चालू होतात. आपण कुंपण ओलांडून पलिकडे जाऊ शकत नाही, ती मुलगी तेच कुंपण ओलांडून अलीकडे येऊ शकत नाही परंतु हा निर्जीव चेंडू मात्र कोणाच्याही नियमांचा दास नाही. तो मात्र यथेच्छपणे नाही तरी आपल्या इच्छेने कोणत्याही अटकावाविना ते कुंपण ओलांडू शकेल हे त्याच्या ध्यानात येते. त्याच्या डोक्यात काही योजना आकार घेते नि त्याच्या चेहर्‍यावर हलकेसे समाधान दिसते.पुढचा दिवस उजाडतो. त्याच्या वहीतील कागदावर पेन्सिलीच्या सहाय्याने विणकामाच्या सुयांचे चित्र अली काढतो. रंगपेटीतला लाल खडू घेऊन त्याभोवती गुंतवळ-स्वरूपात लोकरीचे चित्र काढून ठेवतो. या चित्राच्या वर 'Please' हा शब्द लिहून तिथून खालच्या चित्राकडे एक बाण काढतो. कदाचित इंग्रजीतला तो एकच शब्द त्याला ठाऊक आहे. कुंपणापलिकडच्यांची भाषा नि त्याची भाषा निराळी आहे. तेव्हा थेट शाब्दिक संवाद साधणे त्याला शक्य नाही. त्यावर हा उपाय त्याने शोधून काढला आहे. वहीतला तो कागद तो फाडून काढतो नि आईच्या लोकरीच्या गुंड्यातून थोडा धागा काढून घेतो. त्या धाग्याच्या सहाय्याने तो कागद त्याने त्या चेंडूवर बांधलाय आणि वेळेआधीच तो त्या कारची वाट पाहण्यासाठी हजर झाला आहे. वेळेप्रमाणे कार येते. या अनोळखी दोस्ताबाबत कुतूहल असणारी ती मुलगीही गाडी येत असतानाच नजरेने कुंपणाआड त्याचा शोध घेत येते आहे. गाडीतले दोघे मोठे लोक कुंपणाआड गायब होताक्षणीच तो चेंडू बाहेर फेकतो. आज काय नवे या उत्सुकतेने अधीर झालेली ती मुलगी ताबडतोब धावत जाऊन तो चेंडू ताब्यात घेते. गाडीत बसल्यावर गाडीच्या बंद दाराआड तिच्या हाताच्या हालचाली जाणवतात. मोठ्या उत्सुकतेने ती खाली पाहताना दिसते. नजर वळवते, हलकेसे स्मित करून, मान किंचित झुकवून जणू त्याला काय म्हणायचे आहे ते समजल्याची ग्वाही देते. अलीच्या कुंपणाआडच्या जगातला आणखी एक दिवस संपतो आणि नेहमीच्या दिवसाप्रमाणेच नेहमीची रात्र सुरू होते.त्या रात्री मात्र तो जागाच राहतो. उद्या काय घडेल याची उत्सुकता त्याच्या मनात आहे. त्या मुलीला आपण मागितलेले नेमके समजले असेल का, समजले असेल तरी त्या सुया विकत घेण्याचे आचार-स्वातंत्र्य, आर्थिक-स्वातंत्र्य तिला असेल का,असले तरी आपल्यासारख्या एका सर्वस्वी परक्या मुलासाठी ती आपला पैसा खर्च करेल का किंवा आपल्या पालकांनी करावा म्हणून त्यांना गळ घालेला का, घातली तरी तिचे ते मोठे लोक तिच्या या असल्या मागणीला भीक घालतील का या आणि अशा प्रश्नांचे मोहोळ त्याच्या मनात उठले असेल. तसेच या सगळ्यातून पार होऊन जर त्या सुया हाती लागल्यावर आपल्या आईची प्रतिक्रिया किती आनंददायी असेल याची हुरहुरही त्यात मिसळली असेल.दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडली आहे.  अनावर झालेल्या उत्सुकतेने रोजच्या वेळेआधीच अली छोटीला घेऊन कुंपणापाशी पोचला आहे. त्या गाडीची वाट पाहतो आहे. इकडे झाडाच्या काड्यांपासून केलेल्या सुयांच्या सहाय्याने विणकाम करणे न जमल्याने हताश झालेली त्याची आई ती लोकर घेऊन बसली आहे. तिचे काय करायचे हे तिला समजत नाही. त्या लोकरीमधून सुरक्षा अधिकार्‍याने थेट सुया काढून घेतल्याने अर्धवट राहिलेले ते विणकाम अजून तसेच आहे. त्यातील एक धागा ओढून ती नेहमीप्रमाणे लोकर पुन्हा एकवार मोकळी करू पाहते. पण तिच्या दुर्दैवाने तिने चुकीचा धागा ओढलाय आणि सार्‍या लोकरीचा गुंता झाला आहे. तो सोडवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात तो अधिकच अवघड होत जातो. अखेर एका त्वेषाने ती तो सारा गुंता एका आवेशाने आपल्या हाताभोवती गुंडाळू पाहते. थोडीशी हिस्टेरिक झालेली दिसते. तिच्या दुर्दैवाने नेमक्या त्याच वेळी तिथून रोजच्या राऊंडवर जाणार्‍या त्या सुरक्षा-अधिकार्‍याच्या नजरेस पडते. तिचा तो आवेश पाहून ती स्वतःला इजा करून घेण्याच्या प्रयत्नात आहे असा त्याचा समज होतो. (कात्रीच्या सहाय्याने कदाचित स्वतःवर वार करून घेतलेल्या त्या तरुणाची आठवण अजून ताजी असते.) त्यामुळे तो पुढे होऊन ती लोकर ताब्यात घेतो.इकडे कुंपणापाशी उभ्या असलेल्या अलीला रोजची ती गाडी येऊन पोचलेली दिसते. त्यातून ती स्त्री बाहेर पडते नि वस्तीच्या आत निघून जाते. क्षणभर अंदाज घेऊन ती मुलगी कारचा दरवाजा उघडते. आज तिने आपल्या बरोबर एक लहानशी बॅग आणली आहे. ती बॅग घेऊन बाहेर पडते. त्यातून ती तो चेंडू बाहेर काढते. त्या चेंडूला त्याने बांधलेला कागद आणि लोकर अजून तशीच आहे, पण आता त्यातून दोन विणकामाच्या सुया ओवल्या आहेत. त्या पाहून त्याच्या चेहर्‍यावरचा ताण निवळतो. ती मुलगी धावत येऊन तो चेंडू कुंपणाच्या आत फेकते. चेंडू झेलून तो क्षणभर थांबतो. तिच्याकडे कृतज्ञतेच्या नजरेने पाहतो नि हलकेच हसून धन्यवाद देतो. मुलगी सस्मित होऊन त्याचे अभिवादन स्वीकारते आणि धावत आपल्या कुंपणाआड परतते. हर्षविभोर झालेला अली आणि छोटी आपल्या खोलीकडे धावतात. वाटेवरच फुटबॉल गमावल्याने नाईलाजाने दगडांच्या सहाय्याने गोट्यांचा खेळ खेळणारी मुले त्याला दिसतात. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिरवणारा अली हसून चेंडू त्यांच्याकडे फेकतो. दगड फेकून मुले फुटबॉलच्या मागे धावू लागतात नि अली आपल्या खोलीकडे. अत्यानंदाने धावत सुटलेला तो वाटेत त्याच अधिकार्‍याला धडकतो, त्याला न घाबरता, न थांबता धावतच राहतो. त्यावेळी अधिकार्‍याच्या खिशातून जप्त केलेली लोकर डोकावत असते नि विरुद्ध दिशेने जाणार्‍या अलीच्या चेहर्‍यावर हसू...... कुंपणाआडच्या लोकांच्या गरजा कदाचित त्या दोन विणकामाच्या सुयांइतक्या क्षुद्र असतात नि गाड्यांमधून फिरणारे कुंपणाबाहेरचे लोक त्या अगदी सहज भागवू शकतात... पण भागवत मात्र नाहीत. त्यासाठी त्या छोट्या मुलीच्या मनातली सहृदयता त्यांच्या मनात रुजायला हवी. पण हाती दंडुका असला नि इतरांना कुंपणाआड डांबण्याची ताकद आली की ती बहुधा साथ सोडतेच. अलीच्या वस्तीतील लाल रेताड नि वांझ भूमीप्रमाणे त्यांची आपली मनेही रुक्ष, वांझोटी बनून जातात. माणसे बदलतात, कुंपणे बदलतात पण इतरांना बंधनात ठेवण्याची, आयुष्यातील छोट्या छोट्या सुखांपासूनही त्यांना वंचित करण्याची वृत्ती तशीच राहते. एकेका छोट्या गोष्टींसाठी आस धरावी नि ती मिळेतो हातचे काही सांडून जावे, पूर्ततेचे समाधान कधीच मिळू नये असेच या कुंपणाआड घडत असते. कुंपणे फक्त जड वस्तूंची असतात असं थोडंच आहे. सामाजिक प्रतिष्ठा, अनाठायी शिष्टाचार, कृत्रिम भावनिकता, यांच्या कुंपणांना झुगारून फक्त आपल्या आतल्या माणूसपणाशी प्रामाणिक राहून जगणारा 'वपुं'चा जे.के.३ आपण वास्तवाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात ते माणूसपण कसं पायाखाली चिरडून टाकलं याची जाणीव करून देतो. जीएंचा बिम्म'४तर वास्तवतेच्या कुंपणापार जाऊन पशुपक्ष्यांशी संवाद साधतो. पण मोठे होईतो बालपणीच्या कुंपणांचा आकारही वाढत जातो, आणखी नवी कुंपणे उभी होत राहतात आणि नि आपली जमीन आक्रसत जाते. आज शहरातील स्वार्थजीवी जमिनीच्या एका तुकड्यावर स्वतःच्या नावाची मोहर उमटवण्याचा नादात ते आपल्या फ्लॅटच्या आकारातके लहान करतात, त्यासाठी पूर्वी सामायिक का होईना पण आपल्या हक्काच्या असलेल्या अंगणाच्या तुकडयाचा बळी देतात. कुंपणाआडच्या जगात रोज एक दिवस संपतो आणि नेहमीच्या दिवसाप्रमाणेच दिवसाप्रमाणेच नेहमीची रात्र सुरू होते.(समाप्त) टीपा:१. 'चाळेगत' (कादंबरी) - ले. प्रवीण बांदेकर२. 'कळसूत्र' (कथा): पुस्तकः काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी३. जे.के. (कथा): पुस्तकः  काही खरं काही खोटं - ले. व.पु. काळे४. बखर बिम्मची  - ले. जी. ए. कुलकर्णीअवांतर: अखेरच्या श्रेयनामावलीतच छोटीचे नाव 'फातिमा' आहे हे आपल्याला समजते. इतर पात्रांना तर नावेच नाहीत (अपवाद गाडीतील मुलीचा. तिचा उल्लेख श्रेयनामावलीमधे 'Girl in the car' असा केलेला असला तरी अगदी पहिल्यावेळी ती चेंडू उचलून त्याला देऊ पाहते त्याचवेळी वस्तीच्या दरवाजातून बाहेर पडून कारकडे येणार्‍या त्या स्त्रीची - कदाचित त्या मुलीची आई - 'ल्यूसी' अशी दटावणी देणारी हाक स्पष्ट ऐकू येते.), असायची आवश्यकताही नाही. खरंतर चित्रपटाच्या शीर्षक वगळले तर त्याचे नाव अली नसून अन्य काही असते तरी चित्रपटाच्या गाभ्यातच काय तपशीलातही फारसे फरक करावे लागले नसते. कदाचित त्याच्या आईचा पेहरावच काय तो बदलावा लागला असता, इतकी ही कथा प्रातिनिधिक म्हणता येईल. )
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!