किसानानी

किसानानी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

"आज जायाचा म्हणतुयास तर तेवढं वस्तीवरच्या किसानानीला भेटून ये! तू गावाला आल्यावर घरी पाठवून दे म्हणालीय! थकलीया आता बिचारी!" आईने असे सांगितल्या सांगितल्या मी पायात चप्पला घातल्या अन नानीच्या वस्तीची वाट चालू लागलो. वाट चालता चालता तरुणपणापासून  म्हातारपणापर्यंत जगलेली आख्खी किसानानी डोळ्यापुढे दिसू लागली. मला खुणावू लागली. तिच्यावर आता वाईट दिवस आलेत असं आईनं निघताना सांगितल्यामुळे तर मी अधिकच अस्वस्थ झालो. चालता चालता दोन ठिकाणी ठेचकाळलो. कित्येकवेळा मी लहान असताना आई मला या किसानानीकडे अंडी आणायला पाठवायची. गावात कुठे नाही पण या नानीकडे अंडी नक्की सापडायची.नानीच्या दारात नेहमी चार म्हशी, दोन रेडकं, एक शेरडी, चांगल्या पन्नासभर कोंबड्या दिसायच्याच. या नानीला सहा पोरी. अन सहा पोरींच्या पाठीवर नवसाने जन्माला आलेला मारुती. आणि या मारुतीच्या जन्मानंतर काळाने उचललेला नवरा. एवढीच काय ती इस्टेट अंगावर घेऊन टेचात जगणारी किसा नानी मी लहानपणापासून पहात आलेलो. आता तुम्ही म्हणाल, “पदराला सात पोरं घेऊन बाई कशी जगली असल.” तर किसा नानी जगली. अन पोरं सुद्धा जगवली. नुसत्या पोरीच पोटाला आल्यावर घराला दिवटा पाहिजेल. या नवऱ्याच्या हट्टापायी किसा नानीनं काय काय केलं नसल. तर तिनं दिवटा पोटाला यावा म्हणून सोळा शनिवार उपास केलं. नुसतं उपास करून थांबली नाही तर सोळा गावच्या सोळा मारुतीला पोरगा पोटाला येवूंदे म्हणून साकडं घातलं. आता परत तुम्हाला वाटल कि त्यात अवघड काय? पण हे सगळं तिने अनवाणी पायांनी पायवाटा, काटेकुटे तुडवत सोळा गावचं मारुती पालथं घातलं. एवढं सगळं केल्यावर मात्र दैवयोगाने म्हणा अथवा नशिबाने म्हणा पण तिच्या पोटाला मूल जन्मलं म्हणून त्याचं नाव मारुती.या किसा नानीची वस्ती गावाबाहेरून शांत वाहणाऱ्या नदीच्या अगदी काठावरच. त्या वस्तीवर तिचं एक मातीचं दोन खणाचं घर. त्या घरात तिचा चिलिपिली घेऊन संसार. पावसाळ्यात नदी भरली कि नानीच्या घराला पाणी टेकायचं. नानी पदराला सात पोरं घेऊन अशा दिवसात रात्रभर जागरण करायची. खेड्यात कुत्र्या मांजराशिवाय, शेरडा म्हसराशिवाय घराला घरपण आहे असं वाटतच नाही. अगदी तसाच नानीचा सारा संसार या शेरडा म्हसरांनी जगविला. नानीच्या गोठ्याला कायम एक तरी दुभती म्हैस दिसायचीच. गोठ्यातलं दावं तुटू नये म्हणून नानीचा आपला जन्मभर खटाटोप चालू. पण पोरं वाढू लागली तसं पोटाचं हाल होऊ लागलं. दूधदुपत्यावर भागेना झालं.पण नानी करारी बाई. मागं न हटणारी. आजूबाजूच्या चार गावाच्या बांधाला हाडं घासून घासून नानी पोरं जगवू लागली. रात म्हंटली नाय कि दिवस म्हटला नाय. पण उन्हाळ्यात नानीच्या हाताला काम नसायचं. मग पुन्हा पोटाचं हाल सुरु. त्यावरही नानीनं उपाय शोधून काढला. उन्हाळ्यात गावागावात लग्नसराई, यात्रा-जत्रा सुरु होतात. यात जेवणावळी उठतात. हि जेवणं बनविण्याचे काम पुरुष आचाऱ्याकडे असते. सुरुवातीला नानी या आचाऱ्याच्या हाताखाली कामाला जाऊ लागली. वरीस दोन वरीस गेलं. अन किसा नानी स्वताच आचारी बनली. तिला घरोघरी सुपाऱ्या मिळू लागल्या. त्यावर तिचं पोटपाणी पिकू लागलं. पोरांच्या पोटाला चार घास मिळू लागले. किसा नानीनं केलेल्या जेवणाला अशी चव येऊ लागली कि साऱ्या पंचक्रोशीत किसानानीचच नाव झालं. अर्थात हे सगळं पुरषाचं काम. खेड्यात अगदी आजही आचारी म्हणून पुरुषच दिसतात. ते बाईचं कामच नाही अशीच परंपरा. कारण अशी कामं प्रचंड अंगमेहनतीची. त्यामुळे बाईला यात स्थान नसायचं. त्याकाळी नानीनं यात स्थान मिळवलं. हजार माणसांचा स्वयंपाक केला तरी तो नानीकडून कधी बिघडला नाही.लग्न, बारसं, जत्रा-खेत्रा, पूजा, पाठवण्या, अशा कित्येक जेवणावळीची कामं किसा नानी करू लागली. घरची कामं आटोपून नानी दिवस उगवायला कासोटा घालून खांद्यावर मोठे झारे, लांबलचक उलाथनी, परातणी, वगराळी गड्यागत खांद्यावर टाकून जेवणावळ असणाऱ्या घराकडे जाताना गल्लो गल्लीत दिसायची. चर काढलेल्या चुलवानापाशी जाळ घालत बसलेली नानी घामानं ड्बडबून गेलेली असायची. कधी कधी चरीवरच्या जाळावर रटरटत शिजलेल्या शिरा भाताच्या भल्या मोठ्या हंड्याना चार दोन गड्याना सोबतिला घेऊन खाली उतरताना दिसायची. कितीही पंगती उठल्या तरी नानीनं केलेला स्वयंपाक संपणार नाही कि त्याची चव बदलणार नाही. सारा जन्म नानीनं आचाऱ्याची कामे करून घरदार जगविलं. पोरं शिकविली. वाढविली. सहा पोरींची लग्नं केली. मारुतीचं लग्न तर दारात धूमधडयाक्यात लावून दिलं. आजही गावभर कुणाच्या घरात राबणुकीचं उदाहरण द्यायचं झालं तर ते किसा नानीचंच दिलं जातं.दिवस मावळतीकडं निघाला होता. नानीच्या एक ना हजार आठवणीना अंगावर घेऊन मी नदी पार केली. किसानानीच्या घरासमोर पोहचलो. पण आता अंगणाची सारी कळाच गेलेली. यावेळी तिच्या दारात अंगावर धावून येणारा तिच्यासारखाच तिचा करारी कुत्रा दिसला नाही कि नुसतच लोंबकळत वासे दिसणाऱ्या तिच्या गोठ्यात दुभत्या म्हशी दिसल्या नाहीत. छप्परातल्या मेढीला शेरडं दिसली नाहीत कि अंगणात इकडून तिकडे उड्या मारणारी करडं दिसली नाहीत. नाही म्हणायला मोडक्या गोठ्यात पडलेल्या डालग्याच्या भोवती चार दोन कोंबड्या फिरताना दिसल्या. मी उंबऱ्याजवळ गेलो. नानी सोफ्याला पोतं टाकून बसलेली. वयानुसार आता स्पष्ठ थकलेली दिसली. मला बघताच नानी जागची हलली. मी काही बोलायच्या आतच म्हणाली, "कसा वाट चुकलास बाबा! ये बस!" मी नानीजवळ टेकलो. म्हणाली, "मागच्या दिवाळीत यीचील वाटलं! तवा बी आला नायस! तुज्या आयला किती सांगावं धाडलं गावाव आला कि पाठीव म्हणून!" मी नानीच्या तब्बेतेची चौकशी केली. तिच्या साऱ्या पोरा बाळांची विचारपूस करू लागलो. तिच्या साऱ्या लेकी सुखात असल्याचं आणि अधे मधे येऊन तिला भेटून जातात असं कळालं. मग मी मारुती कसा आहे. गावी येतो का विचारू लागलो तर नानी बिनसली. म्हणाली, " त्येचं नाव सुदीक घिऊ नगस! त्येला आय मेलीया कवाच! घरची नगु झाल्याती त्येला!" मग मी मारुतीपाशीच थांबलो. तिथेच घुटमळलो. तर लग्न झाल्यापासून मारुती एकदाच गावी आल्याचं कळालं. तू एवढं लोकांचा बांध घासून त्याला शिकवलंस. वाढवलस मग तो नेमका असा का वागतोय हे तरी विचारलस का? तर माझा प्रश्न पकडून नानी म्हणाली, "पोरगं मस्त चांगलं हूतं रं पण त्याला बाईल चांगली नाय भिटली! चांगली शिकली सावरली म्हणून केली तर ठाणवीनं पोर नासीवलं बघ! दोन वरसात आय जिती हाय का मेलीय ते बी बघाय आलं नाय! बायकुचा बैल झाला बघ भाड्या!" मी हबकलोच.तू गेलीस का कधी तिकडं? तू विचारलस कधी त्याला? असा का वागतोस म्हणून? तर म्हणाली, "थोरल्या पोरीबर बळबळच एकदा गेली बघ तिकडं! तर भाड्या चार शबुद बोलला बघ कसातरी! ते बी जीवावर आल्यावानी! आयं कशी हायस म्हणून सुदीक ईचारलं नाय! माणसाचा यंत्र झाला बघ भाड्या! रात उजाडली कि गावची एस.टी धरली बघ!" नानी स्वगत बोलल्यासारखी एकसारखी बोलत राहिली. नंतर खोल खोल आत कुठेतरी बुडत निघाली. मी नुसतं ऐकत राहीलो. साठलेल्या नानीला रिकामं करत राहिलो. नानी काय बाय बोलतच राहिली. नंतर नंतर मलाच विचारू लागली, "मारुती असा का वागत असल रं? त्याला आपलं घर, आपलं गाव, आपला गोतावळा का नकोसा झाला झाला असल? तुमी शिकल्या सवरलेली पोरं अशी का वागता रं? का तुमाला तुमचा जीवघेणा भूतकाळ नकू वाटतोय? तुमी तुमच्या जुन्या दारिद्र्याला का लपवू पाहताय? सांग माझं चुकलं तरी काय? मला काहीच कळेना. शब्दच फुटेना. तिच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तरे होतीच कुठे?अंधार पडून बाहेर चांगलाच काळोख दाटला. मी जायला निघालो. नानी भिंतीचा आधार धरून उठली. तिचे गुडघे काळानुसार आता तिला साथ देत नव्हते. धरपडत आतल्या खोलीत शिरली. अन पिशवीतून काय तरी घेऊन आली. म्हणाली, "दहा बारा देशी अंडी हायती! आता कोण हाय बाबा खायला! अन तुला दुसरं द्याला तरी माझ्याकडं आता उरलय तरी काय? नको नको म्हणत असतानाही तिनं दिलेली पिशवी हातात घेऊन मी उंबऱ्याबाहेर पडलो. तर डोक्यात प्रश्न. कासानानीनं हे सगळं जगणं कसं काय पेललं असेल? कशाच्या बळावर हे तिनं सोसलं असेल? तिच्या जगण्याच्या प्रेरणा तरी कोणत्या असतील?  मला न कळणाऱ्या अश्या कोणत्या बळावर ती  जगत असावी? शेकडो प्रश्न. मी तिचा निरोप घेतला. तिला पुन्हा पुन्हा म्हणायचं होतं, "सांग माझं काय चुकलं!" पण हे सगळं ती नुसतच आतल्या आत म्हणत राहिली. मी चालू लागलो. माघारी वळून बघण्याचं धाडसच होईना. कारण ही गोष्ट एकट्या किसानानीची नाहीच मुळी. तर घराघरात जगणाऱ्या शेकडो किसानानींची ही गोष्ट आहे. जगात अशा कित्येक नानी रोज स्वतःला बळी देत असतील. हा कशाचा परिणाम म्हणायचा? बदललेल्या काळाचा कि चटक लागलेल्या शहरी जगण्याचा? अनेक विचारांची डोक्यात घुसळण सुरु झाली. काळोख चांगलाच दाटू लागला. नदीकाठला रातकिडे ओरडू लागले. नदीच्या झाडीतून दूर दिसणारा 'मारुतीच्या' देवळाच्या कळसावरचा दिवा लुकलुकू लागला. मला काहीही करून उद्या दूर सिमेंटच्या जंगलात पोहचायचं होतं. मारुतीसारखंच तिथल्या यंत्रमानवात मला मिसळायचं होतं. या क्षणी माझ्यात असलेला माणूस तिकडे नेऊन यंत्रमानवात विसर्जित करायचा होता. पायाची गती वाढवली. समोर अंधाराचा ढीग पडलेला. कापीत निघालो. तोडीत निघालो. पण डोक्यात नानीचा निरोप घेताना तिने सांगितलेलं शेवटचं वाक्य अजून घुमतच होतं - "त्येला म्हणावं कायमचं गाव इसर! आय इसर! सारी दुनिया इसर! पण निदान माज्या माघारी बहणीसनी तरी ईसरु नगोस! त्यास्नी माहेरात तुज्याशिवाय कोण नाय!"#ज्ञानदेवपोळ फोटो सौजन्य: shutterstock.com 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!