काचापाणी

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

आई, तुझ्या त्या रंगीत रंगीत बांगड्या दे की ग. नाहीतरी नुसत्या पडल्यात. मी फोडून काचापाणी तरी खेळते, हातात पण घालत नाहीस हल्ली.दहा वर्षाची पियू असं बोलताच अश्विनी तिच्यावर जोरात ओरडली, तुला काय खेळच दिसतो का ग नुसता जेव्हा तेव्हा? काचापणी खेळते म्हणे, वेळ काळ कळते की नाही?तुम्ही शिकवला का मग मला?, किती खेळायचो तू, मी आणि आजी. आता आजी नाही तर तू बांगड्यांना हातच लावेनाशी झालीस. खेळत पण नाहीस नी घालत पण नाहीस.मला खेळायला तरी दे नाहीतर हातात घालून तरी बस. अशी नको भुंडी बसू आई, मला नाही आवडत. आठवतं ना, आजी सारखं बोलायची, कानात, गळ्यात, हातात नेहमी काहीतरी असलं पाहिजे. तू जा ग, खेळ अंगणात जाऊन तुझ्या मैत्रिणींबरोबर, मला एकटं सोड. मी नाही देणार तुला काही. एवढ्या डब्बा भरून काचा आहेत घरात जा खेळ त्यांनी, अश्विनी बोलली तशी पियू, पण मला तुझ्याबरोबर खेळायचं होतं, म्हणत पाय आपटत निघून गेली. पियू गेली तसं पुन्हा एकदा भरून आलेलं मन तिने रडून मोकळं केलं. तिच्या सासूबाईंना जाऊन महिना होत आला होता, तरी तिचं दुःख कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच जात होतं. त्या गेल्या त्या गोंधळात तिच्या हातातल्या चार बांगड्या लागोपाठ पिचल्या, तिने त्या काढल्या पण पुन्हा भरायचं मनच झालं नाही. काचांचे तुकडे ना फेकवले ना जवळ ठेवता आले. नजरेआड कुठेतरी टाकून दिले एवढंच. काचा कधी फेकल्या गेल्याच नव्हत्या ना त्यांच्या घरात.......अश्विनीचं सासर गावातलं होतं. अश्विनी चांगली शिकलेली शहरात राहणारी मुलगी होती. लग्नासाठी स्थळं बघताना त्यांना मुलगा शहरातलाच हवा होता. तेच प्राधान्य होतं. पण निशिकांतच स्थळ आलं, मुलगा छान वाटला, गावाजवळच्या शहरात नोकरीला होता. गाव खटकत होत खरं, पण त्या निमित्ताने फिरणं होईल म्हणून ती आणि तिच्या घरचे त्यांचा गाव बघायला गेले, आणि गावासकट निशिकांतच्या घरातल्या माणसांच्याही प्रेमात पडले. अगदी पहिल्या भेटीतच सूर जुळले सर्वांचे. एखाद्या चित्रात बघावं तसं ते नेटकं गाव होतं. गावात पोचताच ती माती अश्विनीला आपलीच वाटली. तिने कधी गाव अनुभवलाच नव्हता. आई बाबांकडचे नातेवाईक सगळे शहरातलेच होते. फार कुतूहल होत तिच्या मनात, गावातली माणसं नक्की असतात तरी कशी बघण्याचं, अन् तेच कुतूहल तिला इथे घेऊन आलं होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); गावात सहा खोल्याचं मोठ्ठ घर होतं निशिकांतच, पूढे मागे मोठं अंगण. आणि दोन्ही अंगणात फळाफुलांची चिक्कार झाडं!! घरात पाऊल ठेवण्याआधीच त्या झाडांनीच अश्विनीकडच्यांचं मन जिंकलं. अगदी प्रसन्न वाटलं त्यांना.घरात माणसं निशिकांत धरून पाच होती. आई बाबा, निशिकांतचा दोन वर्षाने मोठा भाऊ त्याची बायको एवढेच.सगळीच अगदी लाघवी, नुसतं बघायला आलेले अश्विनीकडचे, पण लग्न पक्कं करूनच घरी आले.आपण मुलगी गावात देतोय ह्यावर त्यांचाच विश्वास बसेना. नातेवाईक म्हणायला लागले, बघा हं जपून,  पोरीला राब राब राबवून घेतील घरातले, गावाकडे सगळी काम घरातच करतात, तुमच्या मुलीला सवय आहे का?खरंच या बाबत एवढा विचारच नव्हता केला कुणी, घरची माणसं भावली आणि मनात कसलही किल्मिश न ठेवता पुढच्या चार महिन्यात अश्विनी निशिकांतच्या लग्नाची वाजंत्री वाजली.अश्विनी घरात आली. नवलाईची भीती होतीच मनात, पहिला आठवडा धामधुमीतच गेला, कोण कळलं नाहीच कसं ते. सासूबाईंनी कामापासून दूरच ठेवलं. कामाचा ताण असा दिसलाच नाही तरीही कुणाच्या चेहऱ्यावर. स्वैपाक घरात हाताखाली एक बाई होती. तिच्या सासूबाई आणि वहिनी तिच्याबरोबर हसत खेळत सगळं उरकून टाकायच्या. धुण्यासाठी मशीन होत, भांड्याला बाई होती. निशिकांत तर प्रचंड प्रेमातच होता अश्विनीच्या. शहरातली मुलगी कुठल्याही अटी न घालता गावातल्या मुलाला सहज स्वीकारते, ह्याचं खूपच कौतुक होतं त्याला. त्याची वहिनीही गावातलीच होती. त्यांच्या घरात शहरातून येणारी  अश्विनी पहिलीच. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सासूशी आणि जावेशी दहा दिवस झाले तरी गुळपीठ जमलं नव्हतं. दोघी तिला आवडल्या होत्या एवढं मात्र नक्की होतं.एक दिवस दुपारी जेवण झाल्यावर ती निवांत तिच्या खोलीत पडली असतां, तिला मोठयाने हसण्या खिदळण्याचा आवाज आला. दोन बायकांचा नक्कीच नव्हता तो, ती उठली आणि आवाजाच्या दिशेने गेली तर बाहेर पडवीतच आजूबाजूच्या चार बायका, तिच्या सासूबाई, जावेसकट जमिनीवर बसून काहीतरी खेळताना दिसल्या.ती त्यांच्या इथे गेली, आणि बघू लागली. खूप साऱ्या काचा होत्या त्यांच्याकडे. एक गोल काढला होता, जिच्यावर डाव येईल ती खूप साऱ्या काचा हातात घेऊन  त्या गोलात टाकायची, आणि मग बोटाने एकेक त्या गोलाबाहेर काढायची. काढताना अजिबात हलली नाही पाहिजे, की दुसरीला अजिबात स्पर्श होता कामा नये, अगदी एकमेकींच्या अंगावर चढली असेल तरी हळुवार पणे, आपलं सर्व कसब लावून त्यांना बाजूला करायचं. तिच्या सासूबाईसकट वहिनी, आणि त्या बायका सगळ्या त्याचा आनंद घेऊन उत्साहाने चित्कारत तो खेळ खेळत होत्या. तिच्या सासूबाई तिला बघून म्हणाल्या, ये ग चल तू ही ये. अश्विनी बावरून म्हणाली, मला नाही येत, मी नाही खेळले कधी. तिची जाऊ म्हणाली, सोप्पं आहे ग. बघ तर आमचे गावातले खेळ खेळून.अश्विनीला एकतर हे असं सासूबाईंबरोबर खेळणचं आगळंवेगळं वाटत होतं. असं बघितलं नव्हतंच तिने कुठं. नातेवाईकांनी तर गावातली सासू खाष्ट असणार, कंबर मोडेपर्यंत काम करून घेणार असं अगदी ठासून सांगितलेलं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); ती गेली त्यांच्यात, त्या रंगबिरंगी काचा बघूनच तिचं मन मोहून गेलं. तिच्या समोर पट्टीच्या खेळणाऱ्या       होत्या सगळ्या. तिच्यावर डाव आला, काचा तर टाकल्या, प्रयत्नही केला त्यांना हलकेच बाजूला सारायचा, पण तितकं जमलं नाही. पटकन ती  म्हणाली, मी डाव सोडला. तर तिच्या सासूबाई म्हणाल्या, थांब डाव नको सोडू. हे बघ अगदी हलकेच बोट त्या तुकड्यांजवळ न्यायचं, आणि अगदी अलगद त्याला बाजूला करायचं. कसं सांगू का? आपल्या जीवनात नाही का सुख दुःख सगळी एकमेकांत मिसळलेली असतात. पहिल्यांदा सगळं अवघड वाटतं. पण नंतर मात्र दुःखातून सुख शोधायची किमया आपण साधतोच, अलवारपणे त्या दुःखाला बाजूला करून सुखात रमतो. तसंच हे ही.असं समज वाटेतले काटे काढतेयस तुझ्या, पुढे आयुष्यातही असेच दुःखाचे क्षण अलगद बाजूला करायचेत तुला. या खेळाने पटाईत होशील बघ त्यात.सासूबाईंनी स्वतः करून दाखवलं, तिलाही हळूहळू सगळं जमलं. घरातही रुळली आणि खेळातही तरबेज झाली. सासुशी, जावेशी खेळामुळे छान गट्टी जमली. घरातही सगळं खेळीमेळीनेच होत होतं.नंतर हिने गावातल्या शाळेत नोकरी धरली. रोज खेळला जाणारा खेळ रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी खेळायला मिळायला लागला. पण तिला त्याची खूप ओढ होती. शनिवार आला की मन उल्हासित होऊन जायचं.पुढे तिची जाऊ बदलीमुळे दुसऱ्या शहरात राह्यला गेली.  मग ही आणि सासूबाईंच राहिल्या. जावेच्या आठवणीने चुकचुकत होतं. पण बायकांना जमवून खेळायचा नेम चुकला नाही. चार वर्षाने छोटी पियू घरी आली. मोठी होता होता ती तर निष्णात झाली खेळात. आई, आजी आणि नात रोजच खेळायला लागल्या. नातीचा हट्ट असायचा. मग रात्री झोपण्यागोदर तिघींचा डाव रंगायचा. खेळामुळे तिघी अगदी मनाने एक झाल्या होत्या. अश्विनी तर नंतर त्या सासूबाई आहेत हेच विसरून गेली, दोघी अगदी जिवाभावाच्या एकमेकींना सर्व सांगणाऱ्या मैत्रिणी बनल्या. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  सगळं छान चाललं होतं. अन् अगदी वयाच्या पासष्टीतच सासूबाई पटकन निघून गेल्या. कसला त्रास नाही काही नाही, कुणाच्या तर ध्यानी मनीही नाही. तो धक्का पचवणं सर्वात जड गेलं ते अश्विनीला. तिला आपल्या शरीराचा भागच अधू झाल्यासारखा वाटला. हे दुःख खेळातल्या काचेसारखं अलगद बाजूला करणं तिला जमेचना.मुलगी रोज खेळत होतीच काचापणी, तिला ये ये करायची. पण तिला त्या काचा हातात घेवेनाच. बघितलं की रडूच फुटायचं. किती काचा जमवायच्या सासूबाई, छंद होता त्यांना. कुठलीही बांगडी पिचली की बाई हळहळायला होतं, पण सासूबाईंना काचा वाढणार म्हणून आनंद व्हायचा. त्या काचांत त्या खेळात त्यांचा जीव होता, आणि अश्विनीनेने त्यांनाच बाजूला सारलं होतं.विचार करता करता तिला एकदम लक्षात आलं, खेळाला बाजूला सारलं, म्हणजे मी सासूबाईंनाच बाजूला सारलं की........त्या मला तर खेळातच भेटणार, त्या काचांतच त्या असणार, त्यांना सोडून कसं चालेल?तिने बाहेर खेळणाऱ्या पियूला हाक मारली,आणि म्हणाली, चल पियू, काचापाणी खेळूया. पियू खूष झाली आणि म्हणाली आई, आजीचा डाव सोडूया नको, मी खेळीन तो.अश्विनीचे डोळे भरुन आले, खेळाची सुरुवात करायच्या अगोदरच सासूबाईचं अस्तित्व तिथे उमटलं होतं. सासूबाईंचा डाव कधी सुटलाच नाही, पियुने आपल्या आईसाठी तो कधी म्हणजे कधीच सुटू दिला नाही..........!!त्या नसूनही असल्यासारख्या त्यांच्याबरोबर खेळत राहिल्या, आपला आवडता काचापाणीचा खेळ मायलेकींबरोबर मरणोत्तरही रंगवत राहिल्या...........©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!