कबाडीबाजारमधले बघे...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

परवा इनबॉक्समध्ये एकजणांचा मेसेज आला होता. 'मुलाला सेक्सबद्दल सांगायचंय. पण कसं सांगायचं आणि कोणत्या शब्दात सांगायचं, कोणती वेळ बघून विषय काढू याचा नेमका अंदाज येत नाहीये."त्यांची अडचण बरोबर होती. त्यांनी लिहिलं होतं, "वडीलांच्या हातात कधीतरी पिवळं पुस्तक पाहून आजोबांनी त्यांना हाडं ढिले होईपर्यंत बुकलून काढलेलं, नंतर वडील घरी नसताना व्हिडीओप्लेयरवर पॉर्न कॅसेट पाहताना रंगेहात पकडून वडीलांनी त्याची धुलाई केलेली. आता पिवळी पुस्तके नाहीत की पॉर्न कॅसेट नाहीत, आता मामला अधिक किचकट झालाय कारण पॉर्न सहज उपलब्ध आहे, ते मुलाच्या मोबाईलमध्ये आहे. माझ्या मोबाईलमध्ये आहे, जिथे जिथे इंटरनेट आहे तिथे तिथे पॉर्न आहे. मग मुलाला नेमक्या कोणत्या पद्धतीने विषय काढून सांगू याचा उलगडा होत नाहीये, बापू तू सांगशील का ?" टेक्स्ट मेसेज पाठ्वण्याऐवजी त्यांना कॉल केला. थेट बोलल्यावर त्यांना हायसं वाटलं.मला वाटतं हा प्रश्न अनेकांना पडलेला असणार की मुलाला सांगयचंय, त्याच्याशी या विषयावर बोलायचंय पण तो संवाद नेमका कसा असावा यात अनेकांची पंचाईत होतेय. कारण या आधीच्या कुठल्याच पिढीमध्ये यावर बोलणंच झालेलं नाही. जिथं ठराविक इंद्रियदर्शक शब्द उच्चारणं देखील नंतर नंतर बंद होत जातं, असे शब्द उच्चारले जरी गेले तरी भुवया उंचावतात मग या विषयावरची चर्चा कधी आणि कशी होणार यावर आईसब्रेक व्हायला हवा. ते न करता आपण आक्रोश करण्यात धन्यता मानून मोकळे होतो, आपणही या अत्याचाराविरोधात उभं राहिल्याचं पुण्य घरबसल्या कमावतो. मग प्रश्न येतो की सगळाच देश त्या पीडितेच्या बाजूने उभा असेल तर विरोधी बाजूस कोण उरलं आहे जे आपल्यातच आहे पण आपल्याला दिसत नाही ?      सोशल मीडियावर स्त्रियांच्या अत्याचाराविरुद्धच्या कळवळयाचा जो पूर आलाय तर मग 'ते' ऐंशी लाख नरपुंगव देखील यात सामील असणारच आहेत, ते कोण ? हरेक उत्सवात, मोसमात स्त्रियांशी लगट करणारे ते कोण ? कॉलेजबाहेर उभे राहून मुलींची छेड काढणारे ते कोण ? आपल्या कार्यालयातील सहकारी स्त्रीला आपली कुरवाळण्याची चीज समजणारे ते कोण ? सार्वजनिक ठिकाणी रेटारेटी करून मनातल्या विखारांना जोजवणारे ते कोण ? बस, रेल्वे वा अन्य तत्सम वाहतूक साधनांचा वापर करताना चोरटे स्पर्श करणारे ते कोण ? असे 'ते' जे कुणी आहेत ना ते आपल्या घरीदारी सगळीकडे आहेत, त्यांना आपण आवरत नाही. त्यांच्यावरचा उपाय आपल्याला सापडत नाहीये त्याची ही चडफड आहे. प्रत्येक स्त्रीला माहित असतं की आपल्या नवऱ्याच्या अंगी कोणत्या खोड्या आहेत आणि प्रत्येक आईला माहिती असतं की आपलं कोणतं कारटं कसं आहे आणि जोडीनेच प्रत्येक बहिणीला माहिती असतं की आपल्या भावाचं बाहेर काय चाललं आहे. असं असूनही त्या पुरुषास कुणी आवरू शकलेलं नाही, हे सत्य आहे आणि ते आपण स्वीकारायला हवं, त्यावर मार्ग काढायला हवा. त्यावर अधिकाधिक लिहिलं, बोललं. ऐकलं जावं ते व्हायला हवं. ते करायला गेलं की संस्कृतीरक्षणाच्या गोंडस नावाखाली आपण नाक मुरडतो.हे करण्याऐवजी आपण नेहमीप्रमाणे सोपा सुटसुटीत असा मध्यम मार्ग निवडतात आणि बलात्कार होऊ नये यासाठी झटण्याऐवजी स्त्रीने बलात्काऱ्यापासून कसा बचाव केला पाहिजे यावर भर देऊ लागतो. या ओघात सगळं शहाणपण आपण एकाच घटकाला शिकवत असतो. आता तू शहाणी झालीस बरं का, बसताना स्कर्ट / टॉप नीट मागे ओढून बसत जा बरं का, झाडताना गाऊन पुढे ओढत जा, खाली वाकताना ओढणी नीट घेते जा, गाडी चालवताना सलवार / साडी नीट नेटकी चापूनचोपून घालत जा अशा एक ना अनेक सूचना आपण देत राहतो. टीव्हीवर सॅनिटरी पॅडची जाहिरात लागली तरी घरातली मंडळी कासावीस होतात. केमिस्टकडे पॅड आणायला जाताना तिने ते लपूनछपून घ्यावे लागते की काय अशी आपली मानसिकता, तिने व्हीवॉश घेताना सोबतच्या पुरुषाला लाज वाटते. या जागा, हे शब्द, ही इंद्रिये, ही भूक यांना आपण एका कोनाड्यातल्या पेटाऱ्यात बंद करून ठेवलंय. मग ज्याने त्याने त्या पेटाऱ्याकडे एकट्याने जायचं आणि आपआपल्या परीने त्यातल्या विश्वाचा अर्थ लावायचा असं आपलं चाललं आहे. सेक्स ही एक नैसर्गिक भावना आहे, ती एक प्रकराची भूक आहे तिला स्वीकारून तिचे योग्य पद्धतीने शमन होणे गरजेचे आहे इतकी साधीसोपी गोष्ट आपण मान्य करू शकलेलो नाही. मानवी गरजांच्या अन्य भावनांचा निचरा कसा करायचा यावर आपण अनेकदा बोलतो लिहितो चर्चा करतो पण सेक्सविषयक भावनांचा निचरा कसा करायला हवा हे आपल्यालाच माहित नसतं तर आपण आपल्या पोरांना काय सांगणार ? इथे काम होणं गरजेचं आहे. या साठी शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन एक आकृतीबंध तयार करावा लागणार आहे. ज्यात पालक आणि पौगंडावस्थेतील मुले, तरुण यांचे दोन भिन्न पातळीवर समुपदेशन करावे लागणार आहे. तरुणांशी, टिन एजर्सशी बोलणाऱ्या टीम आणि प्रौढ पुरुषांशी बोलणाऱ्या टीम्स अशा दोन पद्धतीच्या टीम्स तयार कराव्या लागतील. विभाग, जिल्हा, प्रांत, राज्य निहाय या टीम्स बनवून ठरविक काळाची मर्यादा आखून देऊन हे करता येईल. यासाठी मानसोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय व मानसिक कौन्सिलिंगचा अनुभव गाठीशी असणारी मंडळी, सेक्सॉलॉजिस्ट यांच्या जोडीने तरुणांचे आयकॉन असणारी मंडळी, रेडिओ जॉकीज, अँकर्स आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओमधील्या व्यक्ती अशी विविध मंडळी सामील करून घेता येतील. हलक्या फुलक्या चर्चासत्रातून सुरुवात करून शरीराची ओळख करून घेण्यापासून सेक्सच्या शारिरीक भुकेची लक्षणे, त्याचे शमन, त्यातल्या विकृती, भिन्नलिंगी आकर्षण, सेक्सक्सेस कसं करायला हवं आणि काय टाळायला हवं यावर बोलता येईल. मनातलं आभाळ रितं करता येईल. सेक्स ही लपवून वा गुपचूप जाणून घ्यायची गोष्ट नसून त्यावर बोललं गेलं तरी त्याचा निचरा कसा करायचा हे कळू शकतं. हे जेंव्हा होईल खूप बदल घडतील. अगदीच सांगायचं झालं तर सार्वजनिक संडास आणि मुताऱ्यात लागणारी गुप्तरोगांच्या जाहिरातींचे कागदचित्रे देखील बंद होतील कारण लोक यावर खुलेआम बोलू लागतील. आपल्यातल्या भुकेची व तिच्या शमनाची जाणीव नेमकी व्हायला हवी हे आपण ध्यानात घेतल्याशिवाय तरणोपाय नाही. इथे मला मेरठमधल्या लाखीसोबत घडलेल्या एका घटनाक्रमाचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. उत्तरप्रदेशच्या मेरठ मधला कबाडीबाजार हा अत्यंत जुना रेड लाईट एरिया आहे. तिथली २०११ च्या दरम्यानची गोष्ट आहे. लाखी ही १६ वर्षांची पोरजिन्नस. १२ व्या वर्षी तिला हरदोईच्या नाथपुरा मधून तिच्या गुल्लोमौसीने विकत घेतलेलं. तर या लाखीकडे काही दिवसांनी एक गिऱ्हाईक नित्य न चुकता ठराविक काळाच्या अंतरानं येऊ लागलं. तो तिशीतला धष्टपुष्ट पुरुष होता. दिसायला एकदम सामान्य सभ्य. अंगावरच्या कपड्यावरून मध्यम वा कनिष्ठ वर्गात मोडणारा. चालणं बोलणं सगळं सामान्य. गुल्लोमौसीच्या कुंटणखान्यात येऊन तो थेट लाखीच्या खोलीत जायचा. तिची ठरलेली रक्कम द्यायचा.दरवाजा बंद करून तिचे सगळे कपडे काढून तिचे हातपाय सोबत आणलेल्या नाडीने पाचसहा पदरी गाठ मारून करकचून आवळून बांधून ठेवायचा. तिथं बसून दोनचार सिगारेट्स ओढून झाल्यावर तिच्या तोंडात बोळा कोंबायचा. सुरुवातील तिनं त्याला सांगितलं की तू काहीही केलंस तरी मी आरडा ओरडा करणार नाही कारण मी याचेच तर पैसे घेतलेत. त्यावर तिला गप्प करत त्यानं तिचं मुस्कट दाबलंच. नंतर तो तिथंच जेवण करायचा, सोबत आणलेली दारू प्यायचा. पाच सहा तास तिच्यासोबत असे बसून घालवताना भयकथा ऐकवत राहायचा. शारीरिक संबंध न ठेवता निघून जायचा. त्याच्या असं वागण्यानं नंतर नंतर तिला त्याची प्रचंड भीती वाटू लागली. तो आला की ती भिऊ लागली. ती भितेय हे लक्षात आल्यावर त्याला खूप आनंद वाटलेला. ती नसेल तर तो नित्यक्रम चुकवून अधून मधून येऊन तिच्याशी तसंच वागू लागला. त्याला पाहिलं तरी तिची छाती दडपू लागली. भोपाळच्या हमराही रोशनीच्या एका समन्वयकाच्या हाती योगायोगाने ही केस पडली. लाखीला धंदा सोडायचा नव्हता हे लक्षात आल्यावर त्या गिऱ्हाईकाशी तिनं कसं वागलं पाहिजे आणि त्याच्या वर्तनाचा मागोवा कसा घेतला पाहिजे हे तीन चार सलग भेटीत त्यानं लाखीला समजावून सांगितलं. सहा महिन्यानं त्याची मेहनत फळाला आली. त्याच्या वर्तनात काहीसा बदल झाला. नंतर तो यायचा बंद झाला की नाही कळलं नाही कारण लाखीची रवानगी मुरादाबादला झाली. तिथून ती कुठे गेली कळायला मार्ग नव्हता. लाखीकडे येणाऱ्या त्या पुरुषाला त्याच्या लहानपणी चुकांसाठी अद्दल म्हणून कोंडलं जायचं, हातपाय बांधून शिक्षा केली जायची. त्याच्यातला तो सल तसाच टिकून राहिला. एकदा त्यानं बायकोचे हातपाय बांधायचा प्रयत्न केला तर तिनेच त्याला चोप दिलेला. त्यामुळे त्याच्या सेक्स भावनांचे शमन नीट कधीच झालं नव्हतं. लाखीकडे येऊन गेला की त्याच्या भावनांचा निचरा व्हायचा मग त्याचं वैवाहिक जीवन सुरळीत व्हायचं. एखाद्याला तलफ लागावी तसं त्याचं लाखीच्या बाबतीत झालं होतं. लाखीने त्याचा तिरस्कार न करता, भीती न बाळगता विश्वास संपादन करून त्याच्याशी यावर गप्पा मारल्या तेंव्हा त्याचं मन थोडंसं हलकं झालं. त्याचा दोष त्याला थोडासा का होईना पण उमगला.  आपल्या लोकांचं लैंगिक अत्याचारावर व्यक्त होतानाचं अलीकडच्या काळातलं वर्तन पाहता दोष कुणात आहे याचा उलगडा होऊ लागलाय. सगळीकडे नुसता आक्रोश भरून राहिलाय. बलात्कार करणाऱ्या वा बलात्काराचा आरोप असणाऱ्या लोकांबद्दल आपल्या समाजात प्रचंड संतापाचा लाव्हा वाहू लागलाय. हे साहजिक आहे यात गैर काही नाही. मात्र बलात्कार वा लैंगिक शोषण होऊ नये यासाठीचा तिळमात्र संताप आपल्या समाजाला येत नाही. किंबहुना आपण त्यात कमी पडतोय हे लपवण्यासाठीचं हे क्रोधाग्नीयुक्त कर्तव्यपूर्तीचं वेष्टण जो तो लपेटून घेतोय. कुणी कॅण्डल मार्चमध्ये जातोय, तर कुणी मूक मोर्चा तर कुणी उपोषण तर कुणी रास्ता रोको करतोय तर यातलं काहीच शक्य नसणाऱ्या एकाच जागी बसून खुर्ची उबवणाऱ्या वर्गानं साधा सोपा मार्ग शोधलाय तो म्हणजे सोशल मीडियावर उग्र होत जाऊन चिथावणीखोर भडकपणा अंगीकारत थयथयाट करायचा. जो जितका उग्र तो तितका अधिक स्त्रियांचा कैवारी असं काहीसं चित्र निर्माण करण्यात लोक यशस्वी ठरलेत. सगळ्यांना नुसती घाई झालीय ती त्या आरोपीना ठेचून काढून मारण्याची. या घाईमागं कायद्याच्या संथगती कारवाई प्रक्रियेचा उद्रेक असल्याचं बोललं जात असलं तरी याला आणखी एक दर्प आहे जो हरेक गावात, गल्लीत, शहरात, महानगरात खोल खोल दडून बसला आहे तिथल्या पुरुषांच्या अंतरंगात ज्यावर कुणालाच काहीच करायचं नाही. याविषयीचे मेसेज पाठवून लोकांची मने जागृत होतील पण त्यातून पुढे काय नि कसे होईल याचा आराखडा आहे का ? त्यावर रीतसर काम करण्याची वेळ आता आलीय. अन्यथा हे असे भावनांचे पूर सालाबादप्रमाणे येत राहतील आणि आपण आक्रोशत तरी राहू वा उसासे सोडत राहू.लाखीकडे जाणारं ते गिऱ्हाईक लाखो घरात वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपात मौजूद आहे, आपण त्याला बरं करायचंय. त्यासाठी एकमेकाला व्हॉट्सऍप वा फेसबुक मेसेंजर चॅट करून खूप काही साध्य होणार नाही. त्यासाठी थेट आणि निकोप खुली चर्चाच व्हायला हवी. त्याच्या भावाने, मित्राने, बापाने त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. हे न करता केवळ आक्रोश आपण व्यक्त करत असू तर ती निव्वळ आणि निव्वळ नौटंकी असेल ज्यातून आपण आपली हताशा लपवत आहोत हे मान्य करायला हरकत नसावी. आपल्या भवताली एक छुपा कबाडीबाजार आहे ज्यात पुरुष बायकांना सोशलमीडियावर शिव्या देतात, सार्वजनिक जीवनात शारीरिक बळजोरी न करताही अनेक मार्गांनी वासना शमवून घेत असतात. आपण त्या कबाडीबाजारातले बघे आहोत जे प्रत्यक्षातल्या चमडीबाजारमधल्या दलालांपेक्षा वाईट आहेत.- समीर गायकवाड#रेड लाईट डायरीज, #हैदराबाद एन्काऊंटर, #उन्नाव, #लैंगिक शोषण, #निर्भया,
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!