औपचारिक प्रेम

औपचारिक प्रेम

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

प्रेम... म्हणतात कि देवाने निर्माण केलेली प्रेम ही जगातली एक खूप सुंदर भावना आहे. प्रेमामुळे हे होते, प्रेमामुळे ते होते असे अनेक प्रेमाचे गोड किस्से नेहमीच ऐकिवात असतात. पण प्रेम ही जरी मुख्य संकल्पना असेल तरी जिथे समजूतदारपणा आणि विश्वास या दोन गोष्टींचा अभाव तिथे हेच प्रेम विषारी सिद्ध होते.आणि त्यामुळे उठणारा दाह हा अत्यंत असह्य असतो. इथे प्रेम म्हणजे फक्तच एक मुलगा आणि मुलगी यांमधील भावनेचा उल्लेख नसून सर्वच नात्यांमधील प्रेमाला संबोधन करावेसे वाटते. आई- मुलं, मावशी, काका-काकू ,बहीण-भावी, सासू-सून, मित्र-मैत्रिणी अशी कितीतरी नाती या समाजात राहताना अगदी सहज आपल्या भोवताली आणि स्वतःत सुद्धा जन्म घेतात. दोन जीवांमधील एक अचानक निर्माण झालेली आपुलकीची भावना म्हणजे प्रेम. तिथे एकमेकांविषयी काळजी वाटणं , अभिमान वाटणं , राग येणं या अगदी सर्रास घडणाऱ्या कृती. कुणावरही हे प्रेम कधीच ठरवून केले जात नाही किंवा जबरदस्तीने करवून घेतलेही जात नाही. आणि जिथे या दोन गोष्टी घडल्या तिथे प्रेम या शब्दाच्या मूळ अर्थालाच तडा गेलेला आढळतो.त्याचप्रमाणे प्रेम ही जर क्षणाक्षणांच्या लहानमोठ्या घटनांनी घडत जाणारी एक उत्तुंग सुंदर इमारत असेल तर समजूतदारपणा आणि विश्वास हे त्या इमारतीच्या पायाचे मूळ स्रोत. जर हा पायाच भक्कम नसेल किंवा काही काळाने त्याला तडा गेली तर ती अतिशय आनंदाने बांधलेली प्रेमाची इमारत ढासळण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो.आणि मग जीवनाच्या नंदनवनात घडलेला हा एक धरणीकंप संपूर्ण जीवन हादरवून टाकतो. एखादी नवी नवरी आपली सर्व नाती, स्वप्ने मागे सोडून एका नव्या कुटुंबासाठी सासरच्या घरात पाऊल ठेवते. सुरुवातीला सारेच अनोळखी. हळूहळू त्या औपचारिक नात्यांत मायेचा ओलावा निर्माण होऊ लागतो. आणि प्रेमाचा एक गोड पाझर त्या नववधूच्या जीवनात झिरपू लागतो. या हक्काच्या प्रेमातूनच मग हळुवार नकळतच अपेक्षांची कक्षा रुंदावली जाते. या सर्व नव्या नात्यांत ती नवी स्वप्ने पाहू लागते. त्यांना आपलेसे करू पाहते. आनंदाच्या कारंज्यात प्रत्येक दिवशी न्हात असताना अचानक काहीतरी महत्त्वाचे अचानकच तिच्या हातून हरवून जाते. त्या हरवलेल्या गोष्टीमुळे ती कष्टी असतेच पण तरी त्यावेळी ती तात्काळ डळमळत नाही. कारण... कारण तिच्या सोबत प्रेम असते जे इथे आल्यानंतर तिच्या शिदोरीचा एक भाग बनलेले असते. या ठिकाणी हे प्रेम म्हणजे एक खूप मोठा मानसिक आधार असतो. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू आमचीच आहेस अशा कितीतरी बोलांनी त्या परिस्थितीतही तो जीव धैर्याने उभा असतो. पण जेव्हा हळूहळू या प्रेमाच्या खोल गर्तेत दडलेल्या स्वार्थीपणाचा ,नुसत्या दिखावूपणाचा , अविश्वासाचा आभास होऊ लागतो तेव्हा मात्र त्या जीवनात खरा भूकंप निर्माण होतो आणि त्यातून पुन्हा उभे राहणे म्हणजे एक नवी सत्वपरीक्षाच. आपले म्हणणारे, आपली काळजी करणारे , आपल्यावर प्रेम करणारे आपल्याला साधे समजूनही घेऊ शकत नाहीत ही एक भावनाच एका कंटकाप्रमाणे मनात सलत राहते. अंधारात चाचपडत असताना अगदी लगेच बाहेर काढण्याचीच गरज असते असे नाही. एखादा विश्वासाचा , प्रेमाचा एक खरा बोल हा देखील जीवनातील पुढचा श्वास घेण्यासाठी पुरेसा असतो. त्या अंधाराला कायमचा नष्ट करणारा प्रकाशमान करणारा दिवा लावणारा मोठ्या मनाचा कुणी आयुष्यात असणं म्हणजे तर खूप थोर भाग्य. पण असो. अशी खरी नाती फार कमी जणांच्या जीवनात येतात. त्यामुळे खरे प्रेम आणि त्यामागची भावना लक्षात घेऊनच विश्वास ठेवणे आणि पुढे अपेक्षा करणे या पायऱ्यांना जीवनात स्थान देणे योग्य. नाहीतर आधी उपेक्षा आणि मग विरोध दर्शवताच होणारा अपमान याशिवाय त्या निरागस जीवाच्या पदरात इतर काहीदेखील पडत नाही. क्षणाक्षणाला जाणवणाऱ्या या मानसिक दडपणामुळे जीव कणकण तुटत राहतो...आतल्या आतच रडत राहतो ज्याचा हुंदकाही कुणाला ऐकू येत नाही किंवा तोपर्यंत सर्वानी आपले डोळे झाकून आणि त्यांच्या कानांत बोटे असतात . आणि मग कित्येक वर्षांपासून उभारलेली ती सुंदर इमारत कोलमडून जमीनदोस्त केव्हा होऊन गेली हे त्या दोघांनाही कळत नाही. हे एवढे वाचल्यावर मी अगदीच प्रेमाच्या विरोधात आहे वैगरे असा गैरसमज नक्कीच व्हायला नको. ' प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर आणि अनमोल देण आहे' यावर मी अजूनही ठाम आहे. फक्त नुसतेच प्रेम काही कामाचे नाही , त्याचा पाया जो विश्वासाने बनला आहे तो आधी पडताळून पाहायला हवा, त्यात तात्पुरता दिखाऊपणा तर नाही ना हे शोधून पाहावे म्हणजे मग ते प्रेम जीवन फुलवणारे एक पुष्प सिद्ध होईल.कारण या जगात खरे पाहिले तर कोणालाही कोणासाठीही वेळ नसतो किंवा तो द्यावासही वाटत नाही. पण अशा नकली प्रेमाचा देखावा करण्याचे साहस मात्र प्रत्येकजण अगदी आनंदाने पार पाडत असतो. त्यात मग असा नियतीमुळे एकटा पडलेला , आधार शोधणारा वेडा जीव उगाच या औपचारिक नात्यांमध्ये बळी पडतो, रुसतो , रागावतो, दुःखी होतो ते सर्व काही करतो ज्यावर त्याचा हक्कच नसतो. आणि मग एकदा असा काही भावनांचा स्फोट होतो ज्यात सर्व जळून खाक होते. त्यामुळे वेळीच खरे प्रेम ओळखून त्यास साथ द्या नाहीतर स्वतःलाच ओळखून एकट्यानेच आयुष्य आनंदाने जगा. - रुपाली ठोंबरे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!