ऋतूचक्र...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आपल्याकडे हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूमध्ये हिवाळा विभागलाय. गुलाबी थंडीचं हवामान ज्याला म्हटलं जातं तो हेमंत आणि कडाक्याच्या थंडीत जीवसृष्टी गोठून जाते, पानगळीने झाडं मोकळी होऊन जातात तो शिशिर !इथं काही कवी मंडळी याची गल्लत करताना दिसतात म्हणून हे ज्ञानकण !विशेष म्हणजे दिवाळसणाच्या आधी असणारा अश्विन मास शरद ऋतूत येतो, शरदाचं चांदणं खुल्या आभाळाखाली अनुभवल्या नंतर हेमंतातील रजईमधलं गुलाबी चांदणं अनुभवावंसं वाटणं ही या ऋतूची खासियत !शृंगारासाठीच्या सर्वोत्तम रात्रवेळा हेमंत ऋतूत येतात.आरोग्य, मन आणि शरीर या सगळ्यांची प्रसन्नता हेमंत ऋतूत कमाल असते.त्वचा शुष्कतेकडे झुकू लागते आणि मन स्निग्धतेकडे ! हेमंत ऋतूत सर्व प्रकारच्या स्निग्धतेची सर्वाधिक किंमत कळून येते. मग ते साजूक तूपाचं वाण असो की नितळ मुलायम कायेचा आल्हाददायक स्पर्श असो !ऋतूचक्रात माणसांचं कौतुक करावं असं काही उरलेलं नाही कारण त्यानं सर्व ऋतूंवर कृत्रिम उपाय शोधत स्वतःला कथित रित्या सेफ केलंय ! ऋतुचक्रातील बदलांना नैसर्गिक रित्या सामोरं जाण्याची क्रिया माणूस कधीच विसरून गेलाय. निसर्गाचं मात्र तसं काही नाही.हेमंत सुरु झाला की झाडांची साल घट्ट टणक होत जाते जेणेकरून पानगळीने होणारी हानी सीमित होते.घरटी उघडी पडणार म्हणून पक्षांची घालमेल सुरु होते.हेमंतात पानांची देठं कमजोर होत जातात, पाने वेगाने सुकू लागतात आणि शिशिरागमन होताच पानगळ सुरु होते.विहीरी ओढ्यातलं पाणी शांत होऊ लागतं, पिकं डोलू लागतात आणि वारा त्यांना जोजवू लागतो !गोठ्यातल्या गायी अंग चोरून बसतात, वस्तीवरल्या छतात पाकोळ्या सांदी हेरून बसू लागतात.हिरवाई आटू लागलेलं गवत मात्र जरासुद्धा कासावीस होत नाही, एव्हढ्याश्या पात्यांचे भाले करून ते आपलं अस्तित्व जपून ठेवतं !सहा ऋतूंचे सहज परिणाम स्त्रीच्या सौंदर्यावर दिसून येतात. वसंतात तिची काया फुलून येते, ग्रीष्मात ती तावून सुलाखून निघते, आषाढात तिला नवे धुमारे फुटतात, श्रावणात तिच्या सौंदर्यकळांना बहर येतो, शरदात तिला नवा निखार लाभतो, हेमंतात तिच्या गाली लाली चढते आणि शिशिरात ती लाजून चूर होते... !रसिक होऊन या ऋतूंचा आस्वाद घेण्याजोगा समृद्ध असलेला भवताल आपणच बिघडवत आहोत त्यामुळे कुणीही कुणाकडे बोट दाखवायची औपचारिकता इथे ओंगळवाणी ठरेल. आपल्यासारखे नतद्र्ष्ट आपणच !!- समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!