ऋण...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

सांजंची उदासी मारुतीबप्पा घुलेंच्या वस्तीवर दुपारपासूनच रांगत होती, माना तुकवून खिन्न मनानं झाडं उभी होती, झाडांच्या फांद्यातली, ढोलीतली पाखरं पंख आकसून चोच पोटात खुपसून बसली होती. सकाळपासून मोकार वाहणारा वारा धोंडीच्या बांधापाशी खिळून राहिला होता. भादवा संपला नव्हता तरी हवेत उष्मा होता. अपुऱ्या पावसामुळं जिकडं तिकडं फुफ्फुटा तरंगत होता. दुपार सरल्यापासूनच कोंबड्या डालग्यात जाऊन बसल्या होत्या, सुंसुं आवाज करत ओढ्याच्या दिशेने येणाऱ्या हवेनं आणखीनच अस्वस्थ वाटत होतं. गुडघ्यात मान खुपसून बसलेला बप्पा हातातल्या काटकीनं मातीत वर्तुळं काढीत होता. मध्येच उस्मरत होता, खाकरत होता. सभोवार पाहत ठसकत होता. शेजारी बसलेला त्याचा तरणाबांड नातू संतोष बप्पाच्या चाळ्यांनी जरासुद्धा विचलित होत नव्हता. आणि त्याच्या बधीरपणामुळंच बप्पाच्या रागाचा पारा वाढतच होता. अखेर त्याचा संयम संपला, हातातली काटकी मोडून टाकत तो झर्रकन उठला, पच्चकन थुंकत गोठ्याच्या दिशेने निघाला. पंच्याहत्तरी पार केलेल्या बप्पाला ती लगबग झेपणारी नव्हती, तो भेलकांडतच गोठ्यात पोहोचला. श्रीमंत्याच्या वशिंडीवर डोकं टेकवून बडबडू लागला, "आता तू तरी बोल रं दुस्मना ! काय इस्कोट मांडलाय कुणास ठावं ? का सळायला लाग्लायीस रं बाबा ? " श्रीमंत्यानं आपलं डोकं हलवलं, निमुळती टोकदार शिंगं अज्जात आपल्या थकलेल्या धन्याच्या छातीपाशी नेऊन घुसळली, गळ्यातल्या घंटेचा आवाज केला, शेपटीचे फटकारे सुरु केले.त्याला असा बावरलेला पाहून बप्पाचा कंठ गदगदून आला. त्यानं मोठ्यानं टाहो फोडला, "चुकलो रे बाबा माज्या.. पर तू असं वागू नगंस, जीवाला खाऊ नगंस. लई वंगाळ वाटतं रे माज्या राया.. जरा एक डाव घासाला तोंड लाव.. तुला कारभाऱ्याची आण हाय !... " बप्पानं असं म्हणताच श्रीमंत्यानं आपली शिंगं त्याच्या छातीपासून मागे घेतली आणि तोंड खाली वळवून तो मुकाट उभा राहिला. श्रीमंत्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारेला जोर चढला. बप्पानं धोतराच्या सोग्याने त्याचे डोळे पुसले. त्याच्या पाठीवर थापटले, गळ्यातल्या पन्हाळीला आल्हाद कुरवाळलं. श्रीमंत्याला जोजवून झाल्यावर तो कोपऱ्यात बसून असलेल्या यमुनेजवळ गेला. संतोषनं तिला सकाळीच स्वच्छ धुवून ठेवलं होतं, शिंगं घासून ठेवली होती. यमुना गाभण होती. तिचं हे अखेरचं वेत होतं. व्यायला सहासात आठवड्यांचा काळ बाकी असल्यानं तिच्या कासेत सडाच्या ट्युबा भरून ठेवल्या होत्या. तिला आटवण्याची तयारी पुरी झाली होती आणि मध्येच हे विघ्न आलं होतं. एरव्ही नुसत्या दाव्यावर दावणीपाशी बसून असलेल्या यमुनेच्या नाकात वेसण घातलेली होती. नव्या कासऱ्याच्या कडकपणामुळे यमुनेचं नाक हुळहुळत होतं. बप्पानं आपलं मस्तक अलगद तिच्या पोटावर टेकवलं, त्याच्या डोळ्यातून घळाघळा वाहणारे अश्रू यमुनेच्या कासेपर्यंत ओघळत गेले. तिची कास ओली झाली तशी ती बेचैन झाली.काही तरी अघटित घडतंय याचा तिला सुगावा लागला. ती कासावीस झाली, तिनं मान वळवली आणि आपल्या खरबरीत जिभेने बप्पाचे सुरकुतले हात चाटायला सुरुवात केली. मग मात्र बप्पाच्या काळजाचा बांध फुटला आणि तो नेणत्या लेकरागत हमसून हमसून रडू लागला. बप्पाच्या नकळत कुंबीमागून चोरून गोठ्यात पाहणाऱ्या संतोषचे डोळे एव्हाना गच्च भरून आले होते. पण आपण रडलो दाही दिशांनी कोसळणारं अस्मान सावरायला हात पुरणार नाहीत आणि मग बप्पा कुणाच्या बा चं ऐकणार नाही हे तो जाणून होता. सदऱ्याच्या बाहीने डोळे पुसत तो गावाकडं निघाला. त्यानं सायकल काढल्याचा आवाज येताच बप्पा गोठ्यातून धावतच बाहेर आला. "ऐ संतोष आरं ल्येका तू तरी ऐक रं माजं म्हाताऱ्याचं ! असा दावा मांडू नगंस ल्येका... ऐ संतोष ऐ संतोषSS आरं मर्दा ऐक तरी जरा ... " ओरडून ओरडून बप्पाच्या छातीचा पिंजरा लकालका हलत होता, नरड्याचं हाड वेगानं खाली वर होत होतं. डोळ्यातून वाहणारी आसवं गालावरून ओघळत होती, अंग थरथर कापत होतं. त्याच्या हाळ्यांनी संतोषच्या काळजात जणू गिरमिट फिरत होतं, अक्षरशः प्राण पायात आणून तो सायकल चालवत होता. पण त्याच्या पायातली ताकदच गळून गेली होती.जसजसं शेत मागे पडत गेलं तसा त्याच्या कानी येणारा बप्पाचा आवाज क्षीण होत गेला. काही वेळानं यमुनेचा आर्त हंबरडा त्याच्या कानी आला आणि मग मात्र त्याचा तोल गेला. सायकल घसरली, तो जोरात खाली पडला. सगळ्या अंगावर मातीचा लोट उसळला. यमुनेच्या हंबरड्यानं घायाळ झालेला संतोष कितीतरी वेळ रस्त्यातच झाडाखाली विमनस्क बसून होता. दूर मोहित्यांच्या रानात दिवेलागण होऊन गुरांच्या घंटांचा आवाज कानी येताच तो भानावर आला. जड मनाने त्यानं सायकलवर टांग मारली. तो कसाबसा घरी पोहोचला. पवनाआज्जीच्या कुशीत शिरून ढसाढसा रडला. पवनाबाई धीराची होती. तिनं नातवाला समजावलं, डोक्यावरून मायेने हात फिरवून 'जरा पाय मोकळे करून ये' असं सांगत बळेच घराबाहेर पिटाळलं. संतोष बाहेर जाताच पवनेनं देवघरातल्या समईची ज्योत मोठी करत डोळ्याच्या कडांना पदर लावला. देव्हाऱ्यापुढं बसून ती भविष्याच्या विचारात दंग होऊन गेली.मारुती घुल्यांचं वडीलोपार्जित शेत होतं, ते टोकरत टोकरत जाऊन त्यांच्या वाट्याला अवघं दीड एकर रान उरलं होतं. कितीही कष्ट केलं तरी हाती काहीच लागत नव्हतं म्हणून त्यांनी रान कसायचं सोडून दिलं होतं. पाणी नाही की खत नाही आणि निसर्गाची साथ नाही. त्यांची दोन्ही मुलं शहरांत विस्थापित होऊन छोट्या मोठ्या कामावर गुजराण करून स्थिर झाली होती, दोन्ही पोरींची लग्ने झाली होती. त्यांच्या सासरी दिल्या घरी त्या सुख मानून घेत होत्या. बप्पाच्या थोरल्या पोराचा थोरला मुलगा संतोष हा बप्पांचा ज्येष्ठ नातू ! बापापेक्षा आज्ज्यावर जास्ती जीव आणि शहरातल्या कृत्रिम जीवनापेक्षा मातीची ओढ अधिक असल्यानं तो गावीच राहिलेला.मागच्या तीन वर्षात सगळ्या कुटुंबाचा हात आखडता झाला होता, तंगीनं जीव बेजार झाला होता. रान कसत नसल्यानं श्रीमंत्या आणि कारभाऱ्या या जोडीवर ते जगत होते. लोकांचे सांगावे आले की त्यांच्या रानात जाऊन घाम गाळत होते. खिल्लार जातीच्या या चार दाती बैलांत अजस्त्र ताकद होती, त्यांच्या पायात पेटके आलेत असं कधी झालं नव्हतं. जु काढून ठेवलं आणि बैल बसले असं तर कधीच घडलं नव्हतं. निब्बर ढेकळाच्या रानात डुरक्या देत औत ओढताना त्यांच्या तोंडातून फेसाच्या तारा गळत पण कधी शेपूट पिळावं लागलं नव्हतं की कधी त्यांच्या रेशमी कातड्यावर चाबकाची वादी कडाडली नव्हती. चार महिन्याची खोंडं असताना त्यांना घॊडेगावच्या बाजारातून आणलेलं, तेंव्हापासून घुल्यांच्या दावणीची ते शान होते. कुट्टी केलेला कडबा असो वा पुढ्यात ठेवलेली अमुण्याची पाटी असो, जोवर बप्पाचा हात पाठीवर पडत नाही तोवर ते दोघं कशालाही तोंड लावत नसत. त्यांच्या कष्टावर घर चालत होतं. पण एके दिवशी आगळीक झाली.मागच्या काही महिन्यापासून खूप ओढाताण होत होती. घेरडीच्या माळावरून संतोष चारा कापून आणायचा आणि त्या दोघांना द्यायचा, सकाळी कडबा आणि सांजच्याला घास असा बेत होता. पण ऐतवारच्या चाऱ्यासोबत विषारी आकटयाचं गवत आलं. कारभाऱ्यानं ते गवत खाल्लं, त्याला विषबाधा झाली. पोट पखालीसारखं फुगलं, कारभाऱ्या तापानं फुलला. दोनच दिवसात डोळे पांढरे केले. गुरांच्या डॉक्टरांना आणलं गेलं, त्यांनी शर्थीचे उपाय केले पण कारभाऱ्या वाचला नाही. घुल्यांवर आभाळ कोसळलं, जिवाभावाचा माणूस जावं तसा त्यांच्या घरानं शोक केला. यथावकाश कारभाऱ्याला मूठमाती देण्यात आली. पण समस्या इथं संपली नव्हती. एकाएकी कारभाऱ्या गेल्यामुळे त्या दिवसापासून श्रीमंत्यानं चारापाणी बंद केलं. त्याचे डोळे रात्रंदिवस पाझरू लागले. काही केल्या त्याचं चित्त थाऱ्यावर येत नव्हतं. इकडं गावात नांगरणीची कामं जोरात आली होती, बप्पाने आगाऊ रक्कम घेतली होती, लोकांनी दोन दिवस वाट बघून काम तरी करून द्या न्हाईतर पैसे परत करा म्हणून तगादा लावला तसा बप्पाचा जीव कातावून गेला. कारभाऱ्याचं दुःख करावं की लोकांच्या प्रश्नांना तोंड द्यावं याचं कोडं त्याला सुटेनासं झालं. शेतावर कर्ज होतं, घरावर कर्ज होतं, सॊसायटीचं देणं होतं, पवनेच्या अंगावर गुंजभर सोनं उरलं नव्हतं. आता काय करायचं हा सवाल नागफण्यासारखा त्याच्या डोक्यात ठाण मांडून होता.अखेर संतोषनं तोडगा काढला. यमुना आणि तिचं आठ महिन्याचं खोंड विकलं तर निदान एखादा सहादाती थोराड बैल तरी घेता येईल, शिवाय लवकर बैल आणला नाही तर श्रीमंत्याच्या जीवावर यायचं, त्यानं काढलेला धोसरा त्याच्या जीवावर बेतला तर सगळा खेळ खल्लास होणार होता. बप्पा याला राजी नव्हता, पण त्याच्या समोर दुसरा पर्यायही नव्हता. यमुनेच्या आधीच्या चार पिढ्या घुल्यांच्या दावणीत चरल्या होत्या, त्यांच्या दूधदुभत्यावर घरदार वाढलं होतं. त्यामुळे बप्पाचा तिच्यावर अफाट जीव होता, आता ती पोटुशी झाल्यावर तिला विकायला काढायचं हेच त्याला सहन होत नव्हतं. तर दुसरीकडे आपल्या घरादारावर नांगर फिरलेलं पाहण्याचं बळ त्याच्या अंगी नव्हतं. संतोषला ही या निर्णयाचं दुःखच होतं. पण तो अगतिक होता.त्या रात्री घुल्यांच्या घरातल्या सवन्यातुन चादंण्या घरभर नाचत होत्या तरी शून्यात नजर लावलेला बप्पा निपचित पडून होता. काही केल्या यमुना त्याच्या डोक्यातून जात नव्हती. रात्रभर तो कूस बदलत पडून होता, पहाटेच्या सुमारासच त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी बऱ्याच उशिरा त्याला जाग आली. तो जागा होण्याआधीच टेम्पो घेऊन संतोष शेताकडे गेला होता. शेतात येताच त्यानं सगळी आवराआवर केली, यमुनेला कडकडून मिठी मारली. खोंडाच्या कपाळावर ओठ टेकवले, झुली आणि घुंगरमाळांचं गाठोडं घेतलं. जड मनानं यमुनेला टेम्पोत चढवलं. तिच्या पाठीवरून हात फिरवताना तो अक्षरशः ढसाढसा रडला, तिच्या पाया पडला. फडर्र फड फडर्रर्रर्र आवाज करत टेम्पो सांगोल्याच्या बाजाराच्या दिशेने निघून गेला..सांगोल्याच्या गुरांच्या बाजारात गेलेल्या संतोषला परत यायला बराच उशीर झाल्यानं पवनाबाई चिंतेत पडली होती, त्याला परत आलेला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. बाजारातून आणलेला नवीन बैल श्रीमंत्याच्या शेजारी बांधूनच तो घरी आला होता. स्वयंपाक आटोपून दोघांची ताटं वाढून झाली. घास मोडत संतोष सांगत होता, "बैल वाईच थोराड हाये पर अजूक चारेक वर्षे त्याचं खांदं उतरणार न्हाईत.. " बोलताना त्याची नजर बप्पाकडे होती. हातातला घास ओठापाशी नेऊन बप्पा म्हणाला, "यमुना राजीखुशीनं टेम्पोत चढली का रं ? कशी असंल ती ? कुठं असंल ? माज्या बिगर चारा खाईल का ? माजी माय गं ती... मला एक डाव माफ कर गं बाय ... " बप्पाच्या डोळ्यांना पुन्हा धारा लागल्या, त्यासरशी पवनाबाई त्याच्याजवळ गेली. हळव्या आवाजात म्हणाली, "ती आपली मायच हाय... आपल्या लेकरासाठी तिनं स्वतःला बाजारात हुभं केलं, जीव इकला पर आपल्या लेकराचं संकट निवारलं की नाय ? आपली मायच हाय ना ती ! द्येवाची मर्जी जिकडं झाली तिकडं ती ग्येली.. आपण काळजाला बाभळ का टोचून घ्यायची ? येत्या वर्षी नवी कालवड आन रे संतोष ... आपली यमुना तिच्या पोटाला जन्मून यील मग आपण तिची सेवा करू ... असं नेणत्या लेकरावाणी रडू नये... भरल्या ताटावर आसवं गाळू नये.. तिकडं यमुनेला वाईट वाटंल नव्हं !..." पवनाबाईने कशीबशी समजूत घातल्यावर त्या दोघांनी चार घास पोटात ढकलले. ती रात्र बप्पाला फार वाईट गेली. यमुना आणि कारभाऱ्या त्याच्या डोळ्यापुढं तरळत होते. दिवसभरच्या श्रमांनी थकलेला संतोष पडल्या जागी झोपी गेला. तांबडफुटी होऊन बराच वेळ झाला तरी बप्पा शेतात जायला राजी नव्हता, त्याचं पाऊलच रेटत नव्हतं. त्याला अपराधीपणाची सल टोचत होती. अखेर संतोषनं बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर तो राजी झाला. त्याला सायकलवर बसवून संतोषनं शेताकडं कूच केलं, जाताना वाटेने कुणी कुणाशी बोलत नव्हतं, दोघंही शांत होते. दोघांच्या डोक्यात यमुना आणि कारभाऱ्याच्या विचारांचं काहूर माजलं होतं. सूर्य डोक्यावर येण्याआधी ते वस्तीपाशी पोहोचले. बांधावरल्या चिंचेपाशी संतोषनं सायकल लावली आणि ढेकळातून वाट काढत ते वस्तीकडे निघाले. असह्य झालेल्या अबोल्याची कोंडी फोडण्यासाठी कावराबावरा झालेला संतोषच पुढं झाला. "बप्पा काही तरी बोला की, आसं घुम्यागत राहू नगा की... " त्यानं असं म्हणताच बप्पा सर्रकन खाली वाकला, दोन्ही हातात माती घेऊन त्यानं ती तोंडाला फासली आणि म्हणाला, "माज्या आईला इकलंय रे मी.. आता माती दिकून मला जवळ घेणार न्हाई, माजं तोंड काळं झालेलंच बरं रे बाबा ..." बप्पाचा बांध पुन्हा फुटला. त्याच्या तोंडून उमाळे बाहेर पडले. त्याचा आवाज आणि देहाचा गंध गोठ्यापर्यंत जाताच आतून नेहमीच्या ओढाळ आवाजातला परिचयाचा हंबरडा ऐकू आला. तो ऐकताच बप्पाने नेहमीच्या सवयीप्रमाणे हाळी दिली, "यमुने ऐ यमुने, माझी माय गं यमुनेss !" ही हाळी होताच आतून पुन्हा हंबरड्याचा आवाज आला. मग मात्र सगळी ताकद एकवटत म्हातारा बप्पा गोठ्याच्या दिशेने धावत सुटला. गोठ्यात जाऊन पाहतो तर काय ! यमुना आणि तिचं खोंड दावणीला बांधलेलं ! बप्पा अवाक होऊन पाहतच राहिला. कारण गोठ्यात यमुनेच्या शेजारी बप्पाचा मित्र संपतराव उभा होता ! बप्पाला कोडं उलगडत नव्हतं. धाव घेऊन त्यानं आधी यमुनेला मिठी मारली, खोंडाच्या पाठीवरून हात फिरवला, नव्या बैलाच्या वाशिंडीला कुरवळलं, मग संपतची जाणीव होताच त्याला घट्ट मिठी मारली.संतोषनं दिलेलं पितळी तांब्यातलं थंड पाणी पिऊन झाल्यावर अखेर संपतनंच सगळा उलगडा केला. यमुनेच्या पहिल्या वेतातून झालेलं खोंड संपतने बप्पाकडून अगदी स्वस्तात विकत घेतलं होतं. त्याच खोंडाच्या जोरावर संपतनं अनेक बेलगाडा शर्यती जिंकल्या होत्या. बैलांच्या प्रदर्शनात चिक्कार पैसे कमवले होते. सांगोल्याच्या बाजारात संतोषने यमुनेला आणि तिच्या खोंडाला विकल्यानंतर काही वेळातच संपत देखील तिथं आला होता. त्याला नवं खोंड हवं होतं. सादमुद आपल्या बैलासारखा दिसणारं खोंड आणि त्याची आई पाहून त्यानं लगेच ओळखलं होतं की ही गाय आपला मित्र मारूतीबप्पाचीच आहे. त्याचा अंदाज खरा होता. दलालाकडून त्यानं गुरं विकायला कोण आणि कुठून आलं होतं याची सविस्तर माहिती घेतली. सगळा सातबाराच काढला. मग मात्र त्याची खात्री पटली. संतोषने लावलेल्या बोलीपेक्षा जास्त बोली लावत हजारेक रुपये जास्त देऊन त्यानं गाय आणि खोंड विकत घेतली होती आणि सकाळ होताच बप्पाच्या गोठयात आणून उभी केली होती.त्याच्या तोंडून ही हकीकत ऐकताच बप्पानं त्याला मिठी मारली. बप्पाच्या अश्रूंनी संपतचा सदरा भिजून गेला मग कुठे बप्पा भानावर आला. "तुला द्यायला माज्याकडे पैसे न्हाईत बरं का" असं बप्पा म्हणत असतानाच संपतनं त्याच्या भेगाळलेल्या ओठावर बोट ठेवत वाक्य अर्ध्यातच तोडलं. आणि त्याला हात जोडत म्हणाला, "तुजं रिण माज्यावर होतं आणि यमुनेचं रिण दोघांवर बी होतं, तवा तिच्यासाठी कोण पैसं घेईल का ? वर गेल्यावर आपण काय तोंड दावायचं मग ?" त्याच्या या वाक्यासरशी बप्पाच्या मनावरचा ताण हलका झाला आणि बऱ्याच दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. त्याला हसताना पाहून यमुनेच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते, श्रीमंत्या शिंगं हलवत होता, तर शानदार डुरकी मारत नवा बैलही त्यांच्या आनंदात सामील झाला. डोक्यावर आलेला सूर्य आपले अश्रू लपवण्यासाठी मेघाआड लपला आणि मस्त शिरवं पडलं...   - समीर गायकवाड लोकसत्तामधील लेखाची लिंक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!