इथे दुध विकलं जात नाही

इथे दुध विकलं जात नाही

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

सांगली जिल्ह्यातील कडेगाव पासून 10 किलोमीटरवर असलेले आणि नांदणी नदीकाठी वसलेले सासपडे हे पोळ भावकी मोठ्या प्रमाणात असणारे गाव. गावात हजाराच्या वर लोकसंख्या. पण हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे ते वेगळ्याच कारणामुळे. कारण कित्येक पिढ्यापासून गावात दूध विकलं जातच नाही. त्यामुळे हे गाव गोकुळच बनले आहे. नदीवर धरण आणि टेंभू योजनेचे पाणी आल्याने इथली शेती आता बऱ्यापैकी पाण्याखाली येऊ लागली आहे. त्यामुळे हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालाय. गावात जनावरांचीही संख्या चारशे ते पाचशे इतकी आहे. दुभत्या जनावरांची संख्याही मोठी असल्याने रोज शेकडो लिटर दूध गावात तयार होते. पण हे दूध विक्री न करता घरीच वापरले जाते किंवा गावातच उसनवारीने दिले जाते. काही पिढ्यांपासून घरातील जनावरांच्या दुधाची विक्रीच केली जात नसल्याने, सध्या हे गाव पंचक्रोशीत गोकुळनगरी म्हणून ओळखले जातेय. दुधापासून तयार होणारे दही, लोणी, ताक, तूप यासह अन्य दुग्धजन्य पदार्थ घरीच खाण्यासाठी वापरले जातात किंवा ते पै-पाहुणे, शेजाऱ्यांना दिले जातात. एक लिटर तूप देऊन त्याबदली तीन लिटर गोडेतेलही घेतले जाते. पण त्यांची विक्री केली जात नाही. अर्थात हे सर्व घडण्यामागे तशा बऱ्याच दंथकथा गावात ऐकायला मिळतात.गावापासून काही अंतरावर एका डोंगरावर डोंगराई देवीचे मंदिर आहे. पंचक्रोशीत हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मात्र हि देवी या गावची असल्या कारणाने व देवी दुधविक्रीस कौल देत नसल्याने, काहीतरी वाईट घडेल या भीतीने गावात आजही दुध विकले जात नाही. काही जणांनी तसा प्रयत्नही केला पण जनावरे आजारी पडणे, मृत्यू होणे, वांझ राहणे असे प्रकार घडल्याने घाबरून पुन्हा गावात दुधविक्री बंद झाली.सासपडे गावाला पूर्वीपासून मल्लांची परंपरा आहे. पूर्वी गावात पैलवानांची संख्या मोठी होती. खाशाबा पैलवान, गणपत पैलवान, गजेराव पैलवान इत्यादी अनेक पैलवानांच्या नावाने हे गाव अगदी आजही ओळखले जाते. यातील खाशाबा पैलवान म्हणजे अगडबंब ताकतीचा पैलवान या गावात होऊन गेला. दोन बैलांची मोट हा पैलवान एकटा विहिरीतून वर वढायचा. इतका मोठा पैलवान आख्या जिल्ह्यात जन्मला नाही. पण जुन्या काळात प्रसार माध्यमांची कमी असल्याने प्रसिद्धी पासून झाकला गेला. तरीही पैलवानांचे गाव म्हणून सासपडे आजही ओळखले जाते. गावाच्या जत्रेत कुस्त्यांचे जंगी फड भरायचे. गावाच्या पारासमोर भली मोठी तालीम होती. त्या तालमीत अगदी मरेपर्यंत हे पैलवान बसलेले असायचे. गावची पोरं पैलवान झाली पाहिजे म्हणून गावातले दूध गावातच कसे खपवायचो आणि प्यायचो त्या गोष्टी हे पैलवान पुढच्या पिढ्यांना सांगायचे. गणपत पैलवान जुन्या काळी डोक्यावर पितळेची भांडी घेऊन, आजूबाजूच्या गावात इथले लोक दूध,दही,तूप विकायला कसे जायचे हे सांगायचे. त्यावेळी रस्ते न्हवते. पूल न्हवते आजूबाजूला दूध, तूप घेऊन गेलेली लोकं चार चार दिवस नदीचा पूर ओसरेपर्यंत पल्याड थांबायची. मग हे दूध,तूप गावातच वाटून गावची पोरं पैलवान झाली पाहिजेत यासाठी दवंडी देऊन बाहेर दूध,तूप न्यायचे बंद केले. मात्र काहीजण विकायचे थांबेनात. मग एका श्रावणात गावाच्या बैलगाड्या डोंगराई देवीला गेल्यावर तेथे या पैलवान लोकांनी देवीला कौल/नवस केले. त्यात गावचे दूध, तूप गावातच वाटले जाईल. जे बाहेर नेतील त्यांच्यावर देवीचा कोप होईल असे कौल/वचन देवीकडून गावाला घेतले. तेव्हापासून ती भीती गावात राहिली ती अगदी आजपर्यंत. अशी दंतकथाही गावात आज सांगितले जाते.पुढे काळानुसार गावाचे यांत्रिकीकरण झाले. शिक्षणाचे वारे गावात आले. सहकारी संस्थाचा उदय झाला. त्यानुसार गावोगावी दूधसंघ निघाले. १९९५ च्या दरम्यान काही राजकीय नेत्यांनी गावात येऊन दुग्ध विक्रीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. दूध विक्रीबाबतचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः पोळ भावकीमध्ये देवीचा कोप होईल या भीतीने कोण तयार झाले नाही. बाकी यादव, जाधव या गावच्या पाव्हणं मंडळी असणाऱ्या छोटया भावक्या नव्वदच्या दशकापासून दूध विकू लागल्या. त्यावेळी माजी आमदार संपतराव देशमुखानी शेतकऱ्यांना बॅँकेकडून कर्ज उपलब्ध करून देऊन ५० जर्सी व होस्टन गाई खरेदी करून दिल्या. गावात दूध संकलन केंद्र सुरू झाले. त्यावेळी प्रतिदिन सुमारे २५० ते ३०० लिटर दूध संकलन होऊ लागले मात्र, काही दिवसातच यातील काही गार्इंचा आजारी पडून अथवा हवामान लागू न झाल्याने मृत्यू झाला, तर बऱ्याच गाई वांझ राहिल्या. दुधाची विक्री केल्यानेच देवीचा कोप झाल्याचा गावकऱ्यांचा समज झाला. काही दूध विकणारांचे गोठे पेट घेऊ लागले. त्यामुळे लोकांनी पुन्हा दूध विक्रीचा नादच सोडला. आणि गावची डेरी बंद पडली. परंपरागत चालत आलेल्या या रूढी परंपरेमुळेच गावच्या अर्थकारणावर त्याचा थेट परिणाम झालेचं सध्या दिसतय. एकीकडे डिजिटल महाराष्ट्र घडत असताना श्रद्धा, अंधश्रद्धाच्या गाळात अजूनही अशी कित्येक खेडी अडकून बसलीत. ती नक्की कधी विकासाच्या दिशेने झेप घेतील हे येणारा काळच ठरवेल. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!