आभाळातली परी

आभाळातली परी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

तेव्हा आमच्या ज्युनिअर कॉलेज्यात जीन्स पॅन्ट घालून डोळ्यावर काळा गॉगल लावणारी पहिली पोरगी म्हणजे “परी”. सगळी पोरं पोरी सायकलवरून नाहीतर फारफार एस.टीला लोंबकळत कॉलेज्यात यायची. जायची. तर ही बया यामहा मोटरसायकलवरून सायलेन्सरचा जोरात आवाज काढीतच गेटमधनं आत शिरायची. अशा या परीवर आख्खं कॉलेज मरायचं. मग आम्ही तरी मागं कसं असू बरं. वाटायचं अशी पोरगी पटली तर आपलं भाग्य उजळणार. आम्ही उगीच काय बाय स्वप्नं पण बघायचो. पण व्हायचं काय परीच्या जवळ जायचं म्हणजे हात पाय आधीच गळायचं. तिच्याशी बोलायचं म्हणजे लवकर जिभच वळायची नाय. ह्रदयाची नुसती धडधड व्हायची. बरीच जण जवळीक करायचे. या ना त्या कारणाने बोलायला बघायचे. पण परी काय कुणाच्या हाताला लागायची नाही. शेवटी आपली अभ्यासात प्रगती बरी असल्याने ही बयाच बोलायला लागली. नुसत्या तिच्या बोलण्यानंच वाटायचं जुळलं...तर दिवाळीची सुट्टी कॉलेजला पडलेली. सुट्टीनंतर परीक्षा होणार होती. घरी ढीगभर अभ्यास दिलेला. सुट्टीत एके दिवशी ही परी बाई भुंग भुंग गाडी वाजवत आमच्या दारात हजर झाली. बरं ही आली तेव्हा आमची म्हातारी बसली होती सोफ्याला वाकाळ शिवत. मी कुठाय म्हंटल्यावर आमच्या म्हातारीनं गप्प बसायचं कि नाही. तर म्हातारीनं खालतीकडं हात दाखवून सांगितलं, “प्रॉपर्टी संभाळायला गेलाय वड्याला! तशीच रस्त्यांन जा तिकडं भेटल तुला!” ब्रूम ब्रूम गाडीचा आवाज वाजवीत ही बया ओढ्याकडं आली तेव्हा आमच्या हिंडणाऱ्या म्हशीच्या मानेखालच्या गोचड्या मारीत मी बसलो होतो. तीन म्हशी, दोन रेडकं, दोन शेरडं अशी कितीतरी प्रॉपर्टी लहानपणापासूनच घरच्यानी आमच्या नावावर केलेली. आता जीन्स  पॅन्ट अन काळा गॉगल घालून आलेली पोरगी बघून आमच्या म्हशी तिला बघून बुजल्या. नुसत्या बुजल्या नाहीत तर काहीशा लांब पळाल्या. तर ही बया म्हणते कशी, “तुझ्यासारख्याच तुझ्या म्हशी पण भित्र्या कशा रे!” तिच्या या शब्दाने गेलेला आपला जीव परत आला. पण हि ब्याद हिकडं कशाला आली असावी. अन असल्या अवतारात बघून ती या क्षणी कोणता विचार करीत असेल या विचारात मी पडलेलो. तर पुढच्याच क्षणी तिनं सगळं मनातलं द्वंद्व दूर केलं. ही आली होती सुट्टीत आम्हाला ढीगभर प्रश्नपत्रिका घरी सोडवायला दिलेल्या. हा सगळा रेडिमेंट माल माझ्याकडे मिळणार याची आयडिया तिला आमच्याच गावातल्या तिच्या मैत्रीणीने दिलेली. त्यामुळे मघापासून तिला येथूनच पिटाळून लावण्याचा माझा बेत चक्क फसला. तिला म्हंटलं तू हो पुढे! मी आलोच घरी. तिला वाटेला लावलं. म्हशीस्नी ओढ्यात पाणी पाजून मी घराकडं निघालो....परड्यातल्या गोठ्यात मी म्हशी बांधल्या. म्हातारी गडबडीनं बाहेर शेरडीची थानं चूळ चूळ वाजवत पिळाय लागलेली. मी आत शिरतोय तर स्टोच्या फर्र फर्र आवाजानं सगळं घर हेंदकाळत होतं. मी उंबऱ्यातून आत गेलो तर ही बया स्टोपुढं चहा उकळायला लागलेली. क्षणात कितीतरी चित्रं डोळ्यापुढून येऊन पळाली. माझ्याकडे बघत फुस्सsss फस्स करून स्टोची हवा सोडली अन सगळा घरभर आवाज होऊन क्षणात शांतता पसरली. मला बघून वर म्हणते कशी, "आपल्याला पण घरची काम जमतात बरं का!” पण कधी एखदा घरातून तिला घालवीन असं झालेलं. कारण आई बा रानातून घरी टपकले तर हि कुठली बिलामत घरात म्हणून आपली खरडपट्टी निघणार याची कल्पना आधीच आलेली. पण आमच्या म्हातारीचं गुऱ्हाळ काही केल्या संपेना. पाच एकराची भांगलन या साली एकटीनं केलीया म्हणून तिला हात हालवून सांगायला लागलेली. शेवटी चहा पिल्या पिल्या मी सोडवलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तिच्या पुढ्यात टाकल्या. अन कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटल्यावर मला दे असं सांगितलं आणि वाटलं लावली...दिवाळीनंतर कॉलेज पुन्हा सुरु झालं. आधी मधी बोलणं व्हायचं. पण औपचारिकच. त्यातच या परीला एका पोरानं दिली चिट्टी. ते कळालं तिच्या गावच्या पोरांना. मग पोरांची नुसती हाणामारी. त्यातली चार दोन टवाळखोर टाळकी आली माझ्याकडं. म्हणाली, "ती लई रं तुझ्याशी लगट करती! परत तिच्याशी बोलताना जरी दिसलास तर मोडून ठेवू?" झालं. येथून पुढं परी नावाचा विषय आमच्यासाठी कायमचा संपला. समोरून आल्यावर ती बोललीच तर नुसतं हूं हूं करून लांब जायचो. कारण पुन्हा भांडणं झाली अन घरी कळालं तर आपल्याला कॉलेज्यातनं काढून बा कायमचा शेतीत घालील ही मानेवर टांगती तलवार...बारावी होऊन एफ.वाय संपून आम्ही दुसऱ्या वर्षाला गेलेलो. साधारण मार्चचा महिना असावा. परीक्षा जवळ आलेल्या. पण मधल्या काळात परीच्या घरी कोण तरी निनावी पत्र पाठवायचं. त्यात तिचं कुठल्यातरी पोरांसोबत लफडं चालू आहे. पोरीला नजरंखाली ठेवा असं काहीतरी लिहलेलं असायचं. झालं. घरच्यांनी तिचं कॉलेजच बंद करून टाकलं. ती कॉलेजला यावी म्हणून आम्ही पडद्यामागून बरेच प्रयत्न केले. घरच्या लोकांचा सततच्या निनावी पत्रांमुळे परीविषयी संशय वाढलेला. पण खरे तसे काहीच नव्हते. पण घरच्यांनी आमचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पुढं काही दिवसातच तिचं लग्न ठरलेचं समजलं. आम्ही ठराविक मुले मुली तिच्या लग्नाला गेलो. पोटभर जेवून परतलो. त्या दिवशी परी नावाचा अध्याय संपूर्ण कॉलेजसाठी निकाली निघाला...पुढं ग्रॅज्युएट संपून पोस्ट ग्रॅज्युएट झालो. दरम्यानच्या काळात कॉलेजेस बदलत राहिली. नवे मित्र बनत गेले. मागचे काही तूटत गेले. जाणीवा वाढत गेल्या. संवेदना अधिक धारदार बनल्या. याच काळात तंत्रज्ञानाची प्रगती पहिली. अशी कोण परी नावाची पोरगी आपल्यासोबत शिकत होती हि आठवण सुद्धा राहिली नाही. बरेच दिवस पालटले. पुढे पोटाची खळगी भरण्यासाठी गाव तुटलं. गावची माणसं दुरावली. शहरं जवळ होत गेली. पण आपण ना गावचे राहिलो ना या शहरांचे झालो. मध्येच कुठेतरी आपली घुसमट चाललेली. धरपड चाललेली. सततचा संघर्ष सुरु. साधारण तीन वर्षांपूर्वी कोल्हापूरला काही कामानिमित्त जाणं झालं. स्टँडवरच्या एका बाकड्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे इकडे तिकडे निरीक्षण करीत उगीच पहात बसलेलो. पण पलीकडच्या बाजूला बसलेला एका स्त्रीचा चेहरा सारखा आपल्याकडे बघतोय असं कुठेतरी सतत जाणवत होतं. पुन्हा वळून बघावं कि नको या विचारात मग मी सहज मान वळवून पुन्हा त्या चेहऱ्याकडं पाहिलं. तर ती उठली आणि थेट माझ्या जवळ आली. म्हणाली, तुम्ही मला ओळखलत का? मी नुसताच हसलो. चेहरा पहिल्याचं आठवलं. नाव आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. क्षणात खूप मागे गेलो. कित्येक वर्षांची पाने पालटली. आठवलं. होय! ती परीच होती. जवळ जवळ पंधरा वर्षाचा कालखंड संपून गेलेला. पण तिने ओळख ठेवलेली. मी विसरलेली. पुरुष सहसा ओळखून येतात. पण लग्नानंतर केवळ स्त्रीचं नाव गावच बदलत नाही. तर देहयष्टीतही खूपच बदल होत जातात. नंतर बरच बोलणं झालं. विचारपूस झाली. तेव्हाच्या मित्र मैत्रिणीची नावे सुद्धा आम्हाला आठवत नव्हती. तशा तिला कॉलेजच्या आठवणी कमीच. ज्या होत्या त्या दर्दभऱ्या. आतून वेदनाच देणाऱ्या. पण उत्स्फूर्तपणे ती बोलत राहिली. न थांबता. तिच्या पतीची नोकरी बेंगलोर साईडला असल्यानं तिकडेच कुठेतरी स्थायिक असल्याचं तिनं सांगितलं. तिच्या बोलण्यावरून सर्व काही ठीक वाटलं. आनंद वाटला. काही वेळानंतर निरोप घेऊन ती बेंगलोर गाडीतल्या गर्दीत दिसेनाशी झाली...मधल्या या दोन तीन वर्षात या परीची मला आठवण येण्याचं काहीच कारण नव्हतं. कारण परीसारखी कितीतरी मुले मुली मला शिक्षण घेताना वेळोवेळो भेटत गेलेली. काही मेंदूच्या खोल तळाशी गेलेली. काही विस्मरणातही गेलेली. तर काही काचेवर बोटांचे ठसे उमटावेत तशी सतत डोळ्यापुढे तरंगणारी. परवा डेक्कनला एका पुस्तकाच्या दुकानात पुस्तकं चाळत बसलेलो. तर अचानक तिच्या गावचा एक प्राध्यापक मिञ भेटला. बऱ्याच गप्पा मारल्या. पुस्तकांवर बोलणं झालं. मी सहज त्याला सांगितलं. तुमच्या गावची परी मला मागच्या तीन ऐक वर्षांपूर्वी भेटलेली. तर तो मला थांबवत म्हणाला, " तुला माहित नाही का?" त्याच्या या “का” प्रश्नांनंच मी आतून पार घुसळून निघालो. मी पुढे बोलण्या आधीच तो म्हणाला, "अरे तिचा नवरा खूप संशयी होता! ती आता या जगात राहिली नाही..."...रात्रभर डोळाच लागेना. नुसता जुना काळ डोळ्यापुढून पळायचा. सारखी आतून घुसळण चाललेली. तिचा माझा तसा आता काहीच सबंध नव्हता. पण काही केल्या हि परी डोळ्यापुढून जाईनाच. रात्रभर मी फक्त एकच विचार करीत राहिलो, "स्वतःचा काहीच दोष नसताना, सरणावर हकनाक बळी देऊन माती झालेली परी या दुनियेतली नक्की कितवी मुलगी असावी???"...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!