आई.......अगं तू सुद्धा !!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

मी मिहिरा. बारावीत गेलीये मी आता आणि मला एक छोटी बहीण ही आहे सिया.माझे बाबा खूपच चांगले आहेत बरं का. बँकेत कामाला आहेत आणि आमच्यावर तर प्रचंड जीव आहे त्यांचा.स्वैंपाकात सुद्धा निपुण आहेत ते अगदी. खूप छान छान गोष्टी करून खायला घालतात आम्हाला. खूप खूप लाड करतात आमचे. मस्त आहे आमचं कुटुंब..... मजेत हसत खेळत राहणारं.हो पण, एवढं सगळं छान सुरळीत चालू असताना, मनावर अस्सा वार होतो; जेव्हा कोणी विचारतं, आई कुठाय ग तुझी??? आई नाही का तुला???हे सगळं सगळं खोटं वाटायला लागतं एकदम. जखम भरते न भरते तोच कोणी तरी मुद्दाम डिवचून ओली करतं तिला. आई..... आई तर होती ना मला!! आहे अजूनही. फक्त कुठे आहे, काय करते काssही माहीत नाही. संबंध तोडले तिने सारे....!!!पळून गेली ती कोणाबरोबर.....पाच वर्ष झाली आता.मी होते सातवीत, सिया होती दुसरीत. आम्हाला तर वाटलंच नाही आमची आई असं काही करू शकते. आंम्हाला सोडून राहू शकते.किती प्रेम करायचे बाबा तिच्यावर.....ती म्हणेल ती पूर्वदिशा असायची. चुकून सुद्धा कधी संशय नाही घेतला त्यांनी तिच्यावर. आता सारखे म्हणतात, काय तिला कमी पडलं काही कळत नाही.आम्ही तर सारं समजण्याच्या पलीकडे होतो. काय चाललय तेच कळत नव्हतं.आई असं करू शकते???  सगळ्यांच्या आईचे कित्ती गोडवे ऐकत असते मी.....आणि माझ्या घरात???असं पोटच्या पोरांना टाकून कशी जाऊ शकते कोणती आई??एक फोन करून सांगितलं फक्त......आणि मागे ठेवलं आम्हाला निस्तरायला सारं!!बाबा तर तुटून गेलेले अगदी.....जगायचंच नव्हतं त्यांना........आम्हाला संपवून स्वतःला संपवायचा प्लॅन होता त्यांचा.अजूनही पंख्याला अडकवलेली ओढणी दिसते मला डोळ्यासमोर.....पण आमच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून काय झालं कोणास ठाऊक?? आवरला आवेग त्यांनी स्वतःचा आणि संयमाची वाट पकडली.काय भोगत होतो आम्ही आम्हालाच ठाऊक.गावाला राहणारी आजी सुद्धा धक्क्याने गेली.आजूबाजूच्या, इतर नातेवाईकांच्या, शाळेतही शिक्षकांपासून, सर्व मुलांच्या सगळ्यांच्याच नजरा बदलल्या अचानक.नाही नाही ते बोलत होते सारे.....कोण म्हणतं होतं कुठल्या ड्राइव्हर बरोबर पळाली, कोण म्हणतं होतं अगोदर पासूनच होता कोणीतरी, कोण म्हणतं होतं ऑफिसमधल्या कुणाबरोबर गेली. कोण म्हणायचं चांगल्या भरल्या संसारात कसली थेरं आठवली बघा या बाईला.खरं खोटं कोणाला माहीत. पळाली एवढं खरं. आणि मागे वळून पाहिलंही नाही कधी.ती सुटली आणि आम्ही अडकलो. मरता मरता वाचलो आम्ही.आमचं घडण्याचं वय होतं अन् घरात काही भलतंच घडलं होतं.बाबांनी खूप प्रयत्नाने सावरलं स्वतःला. आमच्याकडे बघून सारखे म्हणायचे फक्त तुमच्यासाठी जगतोय रे बाळांनो.खूप खूप रडायला यायचं मला बाबांची अशी अवस्था बघून. मी तर कधीच बघितलं नव्हतं, त्यांना भांडताना आईशी. मग काय चुकलं त्यांचं???तिला काही त्रास असता आणि गेली असती तर एक वेळ समजू शकले असते मी. पण सुखासुखी??? किती लहान होती सिया तेव्हा. सारखी आई पाहिजे म्हणायची, आईला आत्ताच्या आत्ताच बोलवा म्हणायची. आता कळायला लागलंय तर लक्षात येतंय सारं!!मोह....मोहच नाही आवरला तिला. सर्व सोडून पळाली मोहामागे, आपल्या लहानग्यांना सोडून पळाली, सोन्यासारखा संसार टाकून पळाली.आज विचार करते तेव्हा कळतं, आई बरंच काही शिकवून गेली मला. तिच्याकडून नकळत का होईना मिळालं मला बरंच काही!!!अविचाराने कसं वागू नये याचं आयुष्यभरासाठी उदाहरण मिळालं मला तिच्याकडून. पन्नास काय शंभर वेळा विचार करते मी आता एखादी कृती करताना. आपल्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये याची सतत काळजी घेत असते मी. कोणत्याही मोहापासून चार हात लांबच राहते मी, माझ्या वयाला न शोभणारा विरक्तपणा देऊन गेलीये ती तिच्या वर्तनाने मला.तसं तर कोणावाचून कोणाचं काही अडत नाही. पण एकदा मनातून उतरलेलं माणूस सुद्धा पुन्हा काही केल्या मनात भरत नाही. तशीच ती.....उतरलीये मनातून आमच्या. तिला काय त्याचं म्हणा???आज पहिल्यांदा मनात साचलेलं सारं मोकळं केलं मी लिहून, कित्ती हलकं हलकं वाटतयं. Thank u बाबा मला ही डायरी गिफ्ट दिल्याबद्दल!! खूप वर्ष कुढून कुढून काढली, पण आता मात्र हिच्याबरोबर सर्वकाही शेअर करत राहिन मी!!हल्लीच मी लागोपाठ दोन तीन बातम्या वाचल्या. दोन लहान मुलींची आई आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली आणि तो आघात सहन न झाल्याने नवऱ्यानेही दोन्ही मुलींना मारून आत्महत्या केली. फोटो पाहिला तर किती छान निरागस होत्या मुली. मन हेलावलं अगदी. दुसऱ्या बातमीत होतं, दिड वर्षाच्या मुलाला बस स्टँडवर सोडून आई पळाली प्रियकरासोबत.आपल्या मनात असलेल्या आईच्या प्रतिमेला धक्का देणाऱ्या या बातम्या. चक्रावून सोडलं या बातम्यांनी मला. आताशा जरा जास्तच कानावर पडायला लागलंय असं काही. आई सुद्धा असं करू शकते?? दुसरं कोणतंही नातं असतं तर जड नसतं गेलं एवढं पचवायला. पण आई...... आईने तरी नको होतं ना असं वागायला???काय वाटतंय तुम्हाला???©स्नेहल अखिला अन्वित
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!