अविस्मरणीय रूपकुंड - भाग ६ - हुकलेले कुंडदर्शन

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ६ - हुकलेले कुंडदर्शन

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

काळू विनायकाच्या शेजारील हॉटेलातून बाहेर पडलो तेव्हा गारपीट नुकतीच थांबली होती. गारांचा वर्षाव करणारा तो काळाकुट्ट ढग आता दरीच्या दिशेने पांगला होता. त्या आलेदार चहाने थोडीफार हुशारी वाटत होती. डोकं ठणकत होतंच. पण भग्वबासाचा कॅम्प समोरच दिसत होता. त्यामुळे सगळ्या शरीराच्या अपेष्टांकडे दुर्लक्ष करून मी पुढे चाललो होतो. वाट तर सपाटच होती. पण संपूर्ण वाटेवर गारांचा खच पडला होता. त्यामुळे वाट फारच निसरडी झाली होती. काळजीपूर्वक एकेक पाउल टाकत आमची वरात चालली होती. तेवढ्यात होते-नव्हते ते सारे ढग कुठेतरी गायब झाले आणि सूर्याची प्रखर किरणे त्या भूदृश्यावर झेपावली. अंधाऱ्या बोगद्यातून दीर्घकाळ चाललेली ट्रेन अचानक बाहेर यावी आणि बाहेरच्या प्रकाशाने डोळे दिपून जावेत तसेच काहीसे झाले. त्या प्रखर प्रकाशात त्या वाटेवर पडलेल्या गारा आणि आजूबाजूच्या डोंगरावर पडलेले बर्फ अक्षरशः तळपू लागले. दहा मिनिटांपूर्वी गारांच्या तडाख्यातून बाहेर पडलेले आम्ही आता बॅगेत गॉगल शोधू लागलो. खड्या चढणीवर लागलेली गारपीट, त्याच्या नंतरचा आल्याचा चहा, आणि आता समोर उभे ठाकलेले हे अवर्णनीय दृश्य! हिमालयातला ट्रेक तुम्हाला निसर्गाची विविधरंगी रूपे कधी आणि कोणत्या क्रमाने दाखवेल याचा काहीएक नेम नसतो. ही अनिश्चितताच हिमालयातल्या ट्रेकचे व्यसन लावते.   भग्वबासा कॅम्प साईट  त्या तळपत्या बर्फाळ वाटेवरून आम्ही सावकाश पुढे निघालो होतो. डावीकडच्या डोंगररांगेच्या मागे त्रिशूल आणि नंदा घुंटी ही शिखरं दिमाखात उभी होती. त्यांच्यावरची बर्फाची चादर थोडी जास्त जाड झाल्यासारखी वाटत होती. उजवीकडचा बोडका डोंगरही बर्फाने माखला होता. कॅम्पसाईटच्या मागच्या रांगेच्या खोबणीत कुठेतरी रूपकुंड वसले होते. त्याकडे जाणारी वाट एका पुसट रेघेसारखी दिसत होती. उद्या याच वाटेने आपल्याला कुंडाच्या दर्शनासाठी जायचे आहे अशी मनातल्या मनात मी तयारी करत होतो. कधी एकदा कॅम्प साईटवर पोहोचतोय असे झाले होते. म्हणता म्हणता ती वाट संपली. त्या प्रचंड बर्फाळ पठारावर वसलेल्या कॅम्प साईट वर आम्ही एकदाचे पोहोचलो. ही कॅम्प साईट म्हणजे जणू एक लहान गावच होते. जवळपास शंभर-दोनशे तंबू तिथे लागले होते. त्या जोडीने हॉटेल्स, खेचरांसाठी बांधलेल्या शेड्स, या सर्व सोई पुरवणाऱ्या लोकांचे तंबू वगैरे होतेच. रूपकुंडची लोकप्रियता आता कुठे जाणवत होती. थोडा वेळ तंबूमध्ये विश्रांती घेऊन मी आजूबाजूला भटकायला बाहेर पडलो. निसरड्या बर्फामुळे फार लांब कुठे जाता येत नव्हतं. शिवाय दर दोन पावलांवर दम लागत होता. इथली उंची होती ४३०० मीटर! ऑक्सिजनची कमतरता चांगलीच जाणवत होती. ग्रुपमधले ४ जण अर्ध्या वाटेतच पाथार नचुनीला परत गेले होते. त्यामुळे आता इथे जेमतेम १५ जण उरलो होतो. उद्याच्या अंतिम टप्प्याबद्दल मनात हुरहूर दाटून आली होती. ४३०० मीटर उंचीवर बर्फात लागलेले तंबू संध्याकाळचे सूप घेऊन रघू आला. पुढच्या दिवशीच्या महत्त्वाच्या सूचनांसाठी त्याने सगळ्यांना एकत्र बोलावले. कुंडाकडे जाण्यासाठी पहाटे २ वाजता निघायचे होते. त्यासाठी बर्फावर चालायचे काटेरी बूट आम्हाला मिळणार होते. बूट वाटण्याआधी त्याने सगळ्यांची ऑक्सिजन पातळी तपासली. साधारण ८० च्या वर ऑक्सिजन असलेल्यांनाच कुंडाकडे जाण्यास परवानगी होती. माझ्या बोटाला ते यंत्र लावले आणि आकडा आला ६५! मी धास्तावलोच! इतका कमी कसा असेल ऑक्सिजन? मला डोकेदुखी वगळता बाकी काहीच होत नव्हतं. रघू म्हणाला, AMS (acute mountain sickness) काही सांगून येत नाही. कोणतीही पूर्वलक्षणे न दिसताही त्या उंचीवर माणूस अचानक आजारी पडू शकतो. आजार बळावला तर त्याला खाली आणण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि वेळेत खाली आणता नाही आले, तर मृत्यूही ओढावू शकतो. या सगळ्या शक्यतांची मला ऐकून-वाचून माहिती होती. पण त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव आत्ता पहिल्यांदाच येत होता. उगीच विषाची परीक्षा कशाला? कोण बक्षीस देणार आहे मला कुंडापर्यंत गेल्याचं? जे करतोय ते निव्वळ निसर्गप्रेमासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानासाठी. मग उगीच जीव कशाला धोक्यात घालायचा? मी मनोमन वर न जाण्याचा निर्णय घेतला. सोबतच्या बऱ्याच जणांची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यांपैकीही कोणीच वर जाणार नव्हते. जेमतेम ८-१० जणांनी वर जायची तयारी दाखवली. त्यांना आवश्यक त्या सूचना आणि बर्फावर चालायचे प्रात्यक्षिक दाखवून रघू रात्रीच्या जेवणाची तयारी करायला निघून गेला. रूपकुंड कडे जाणारी वाट अंधार पडू लागला तशी थंडी वाढू लागली. आता बाहेर थांबणे काही शक्य होत नव्हते. पटापट जेवण उरकून आम्ही तंबूमध्ये येऊन विसावलो. काही वेळातच गडद ढगांच्या दुलईत कॅम्प साईट हरवून गेली. होते नव्हते ते सारे कपडे अंगावर चढवले. स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. झोप कसली लागतेय! एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतानासुद्धा दम लागत होता. त्यात थंडीने हुडहुडी भरत होती. तशात उठून मूत्रविसर्जनासाठी बाहेर जाणं म्हणजे तर दिव्यच! आयुष्यात अशी परिस्थिती कधी आली नसेल की निव्वळ शरीरधर्म उरकणे म्हणजे मोठे संकट वाटावे! तासाभराने पुन्हा रघू ऑक्सिजन पातळी तपासायला आला. अजूनही आकडा ६० च्या पुढेमागेच दिसत होता. मला आता काळजी वाटू लागली. पण या उंचीवर ऑक्सिजनचे हे प्रमाण तसे नॉर्मल होते. अजून जास्त उंचीवर जाणे किंवा कोणतीही दम लागू शकेल अशी हालचाल करणे मात्र योग्य नव्हते. मी शांतपणे पडून प्राणायम करताना घेतात तसे दीर्घ श्वास घेऊ लागलो. वर न जाण्याचा माझा निर्णय योग्यच होता. कधीतरी डोळा लागला. पहाटे तीनला कुंडावर जाणाऱ्यांची लगबग सुरु झाली तशी झोप उडाली. वर जाणाऱ्या मंडळींना बसल्या जागेवरून शुभेच्छा देऊन मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो. सकाळी सातच्या सुमारास विकी सगळ्यांना उठवायला आला. डोकं प्रचंड ठणकत होतं. कसाबसा आवरून तंबूच्या बाहेर पडलो. उपचारापुरता नाश्ता केला. कुंडाकडे गेलेल्या लोकांसोबत रघू गेला होता. विकी आणि विजयेंद्रजी खाली थांबलेल्या आम्हा लोकांना पाथार नचुनी पर्यंत घेऊन जाणार होते. तब्येतीच्या अवघड अवस्थेतून बाहेर येण्यास खाली उतरणे हा एकमेव मार्ग होता. नशिबाने रस्ता उताराचा होता. स्वच्छ ऊन पडलं होतं. लवकरच आम्ही पाथार नचुनीच्या मार्गाला लागलो. कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रेकर्सची रांग दिसत होती. आजूबाजूची शिखरे अजूनही ढगांच्या दुलईतून बाहेर पडली नव्हती. वाटेवरचे बर्फ रात्रीच्या थंडीमुळे गोठलेले दिसत होते. अर्ध्या तासातच आम्ही काळू विनायकापाशी पोहोचलो. काल ढगात हरवलेले ते मंदिर आज मोकळ्या वातावरणात फारच विलोभनीय दिसत होते. हा विनायक म्हणजे रूपकुंडचा रक्षणकर्ता. जोपर्यंत त्याची कृपा आहे तोवर सारे काही सुरळीत राहील अशी स्थानिकांची श्रद्धा. अनिश्चित आणि अस्थिर निसर्गापुढे टिकून राहण्यासाठी श्रद्धेचे बळ किती महत्वाचे आहे हे अशा ठिकाणी गेल्यावर कळते. इथे ना होता कोणी पुजारी, ना होते नवस-सायास करायला ठराविक दिवशी चेंगराचेंगरी करत येणारे भक्तगण. होते ते केवळ त्याच्या अस्तित्वाचे एक प्रतीक! त्या रौद्रभीषण निसर्गापुढे जगण्याची उभारी देणारा एक आधार. देवत्व असे शुद्ध अवस्थेत फार कमी ठिकाणी बघायला मिळते. कठोर नास्तिक असलेले माझे मन त्या ठिकाणी, का कोण जाणे, थोडेसे हळवे झाले.                           काळू विनायक मंदिर (फोटो सौजन्य - सौरभ ताम्हनकर)आता तीव्र उताराची वाट सुरु झाली. काल जिथे गारांनी झोडपलं होतं त्या जागी आज चिखलातून वाट काढत, न घसरता, न पडता खाली उतरणं हे मोठं आव्हान होतं. हळूहळू आम्ही खाली उतरलो. पाथार नचुनीच्या कॅम्पवर  पोहोचलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. आम्ही तंबूत शिरलो आणि तेवढ्यात कालच्यापेक्षाही जोरदार अशी गारपीट सुरु झाली. थोडक्यात बचावलो म्हणून हायसे वाटले. मी एक क्रोसिनची गोळी घेतली आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. डोकेदुखी आता बऱ्यापैकी कमी झाली होती. आजची रात्र इथेच काढायची होती. संध्याकाळी गप्पा-टप्पा करून लवकरच झोपी गेलो.क्रमशः 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!