अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

हिमालयातले गिरीभ्रमण म्हणजे एक व्यसनच. एकदा का त्याची चटक लागली की किमान वर्षातून एकदा हिमालयाशी गळाभेट झाल्याशिवाय रहावत नाही. मुंबईतला असह्य उन्हाळा (खरे तर घामाळा!) सुरु झाला की हिमालयातल्या थंडगार जागांचे वेध लागतात. त्याच सुमारास हिमालयातले बर्फ वितळू लागते आणि ट्रेक्स सुरु होतात. एव्हाना हिमाचल प्रदेशातले दोन ट्रेक झाले होते. उत्तराखंड मधील हिमालय अजून पाहिला नव्हता. उत्तराखंड मधील रूपकुंड, हर कि दून, रुपीन पास, पिंडारी ग्लेशियर अशा अनेक ट्रेक्सविषयी ऐकले होते. विशेषतः रूपकुंड या जागेविषयी आणि तिथल्या मानवी हाडांविषयी बरेच काही ऐकले आणि वाचले होते. त्यामुळे या वर्षीची हिमालय भेट म्हणजे रूपकुंड असे ठरवून मी एका प्रस्थापित ट्रेकिंग ग्रुप कडे ट्रेकचे बुकिंग केले आणि ट्रेकच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. रूपकुंडचा नयनरम्य देखावा. फोटो आंतरजालावरून साभार. रूपकुंड म्हणजे उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील सुमारे ५००० मीटर उंचीवरील एक लहानसे हिम-सरोवर. त्रिशूल आणि नंदा घुंटी या दोन शिखरांच्या मध्ये वसलेले हे सरोवर उत्तराखंड मधले एक लोकप्रिय ट्रेकिंग स्थळ आहे. ट्रेकिंग चा बराचसा मार्ग अति उंचीवरील असल्याने तशी शारीरिक क्षमता असणे आवश्यक होते. त्यामुळे मी महिनाभर आधीपासून तयारी सुरु केली. जिम मध्ये पायांच्या व्यायामावर जास्त भर द्यायला सुरुवात केली. रोजच्या गडबडीत जिमला नियमित जाणे शक्य होत नव्हते. म्हणून ऑफिसमधून येताना किमान ५ किमी चालत यायला सुरुवात केली. मुंबईतला दमट उकाडा आणि चार पावलं चालल्यावर लागणाऱ्या घामाच्या धारा असह्य होत होत्या. कधी एकदा थंडगार जागी जातोय असं वाटत होतं. अखेरीस तो दिवस उजाडला. मुंबईहून विमानाने दिल्लीला उतरलो. दिल्लीतली कोरडी आणि गरम हवा अगदी नकोशी वाटत होती. मुंबईहून आलेले ग्रुपमधले इतर काही ट्रेकर्स दिल्लीत भेटले. ओळख-पाळख झाली. ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांची एक विशिष्ट वेव्हलेन्थ असते. किंवा ट्रेकिंगचा मूडच असा असतो की लोकं वेगळ्या वेव्हलेन्थने विचार करू लागतात. त्यामुळे नवीन लोकांशी मैत्री व्हायला फार वेळ लागत नाही. तीच लोकं जर इतर कुठे भेटली तर कदाचित मैत्रीच्या तारा जुळणार नाहीत. पण ट्रेकिंगमध्ये त्या नक्की जुळतात. असो. नव्याने मैत्री झालेल्या चमू सोबत बसने रात्रीचा प्रवास करून काठगोदामला पोहोचलो. काठगोदाम म्हणजे उत्तराखंड मधले शेवटचे ट्रेन स्टेशन. इथून पुढे हिमालयाच्या उंच पर्वतरांगा सुरु होतात. आमची यापुढची सगळी व्यवस्था ट्रेकिंग ग्रुप तर्फे होती. ठरल्याप्रमाणे गाडीचालक भेटला आणि आमचा लोहाजुंगच्या दिशेने प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात तीव्र वळणांचा घाट सुरु झाला. एक-एक वळण घेत गाडी वर चढू लागली. तासाभरातच आम्ही सुमारे १४०० मीटर उंचीवर पोहोचलो. वातावरणातला बदल एकदम जाणवू लागला. थंड आणि प्रसन्न हवेची झुळूक आली आणि वाटलं, याच साठी केला होता अट्टहास! एका छानशा ढाब्यावर नाश्त्याला थांबलो. गरमागरम आलूपराठे गट्टम करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. भरल्या पोटी थंड हवेवर छान डुलकी लागली होती. इतक्यात चालकाने करकचून ब्रेक दाबला आणि मी तर जवळपास आपटलोच! पाहतो तर काय, समोर मेंढ्यांचा भला मोठा कळप भर रस्त्यातून चालला होता. त्यांचा मेंढपाळ जवळच्याच दगडावर विडी फुकत, मध्येच एखाद्या मेंढीला हाकत, निवांतपणे बसला होता. दोन्हीकडची वाहतूक जवळपास थांबली होती. आपण हिमालयात पोहोचलो आहोत ही भावना आता कुठे sync in होत होती. पाच-दहा मिनिटात मेंढ्या त्यांच्या मार्गाला लागल्या आणि आमचा लोहाजुंगकडचा प्रवास पुन्हा सुरु झाला. लोहाजुंगच्या वाटेवरील कौसानी येथील रम्य दृश्य अल्मोडा मागे पडले आणि निसर्गाचे रूपही बदलू लागले. खोल दऱ्या, त्यांतून रोरावत वाहणाऱ्या नद्या, उतारावर सरळसोट वाढलेले सूचीपर्णी वृक्ष, मध्येच एखाद्या वळणावर दृष्टीस पडणारी हिमशिखरे असे ते लोभस दृश्य फारच सुखावह वाटत होते. प्रवासाचे एकूण अंतर होते साधारण २७० किमी. पण अरुंद घाटरस्ता, मध्येच येणारे प्राण्यांचे कळप, कधी रस्त्याचे चालू असलेले काम अशा काही कारणांनी या प्रवासाला १० तास लागतात. भोवतालचा निसर्ग कितीही सुंदर असला तरी काही वेळानंतर सततच्या वळणांचा आणि गाडीच्या घरघरीचा त्रास होऊ लागतो. आमच्यातल्या एक-दोघांच्या उलट्या करून झाल्या होत्या. मलाही मळमळत होते. पण नशीबाने जास्त त्रास झाला नाही. एकदाचे संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही लोहाजुंगला पोहोचलो. इथे एका डॉर्ममध्ये राहण्याची सोय होती. हवेत कमालीचा गारवा होता. ट्रेकलीडर सोबत ओळख झाली. त्याने काही महत्वाच्या सूचना दिल्या. पुढच्या दिवशी ट्रेक सुरु होणार होता. इथे ग्रुप मधले इतरही काही जण भेटले. एकंदरीत २५ जणांचा ग्रुप होता. बहुतांश सगळे मुंबईचेच होते. या नव्या दोस्तांसोबत थोडा वेळ गप्पा रंगल्या. प्रवासाचा शीण जाणवत होता. शिवाय दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या आव्हानासाठी उर्जा बचत करायची होती. फार वेळ गप्पांमध्ये न दवडता सगळे जण जेवण वगैरे आटोपून झोपी गेलो.लोहाजुंग (उंची - २४०० मीटर)क्रमशः 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!