अत्रेसाहेबांना अभिवादन!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

दि. १३ जून हा माझ्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा दिवस! १३ जून १९६९ रोजी रोजी आचार्य अत्रे ह्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. योगयोगाचा भाग असा की १३ जून १९६८ रोजी मी ‘मराठा’त रूजू झाला. १३ जून ६८ ते १३ जून ६९ ह्या वर्षांत महापुरूषांच्या सावलीत सुखनैव वावरण्याचे भाग्य मला मिळाले. हे भाग्य मला मिळाले नसते तर कदाचित् दिशाहीन आयुष्यात मी भरकटत गेलो असतो. पण नियतीला माझे भरकटणे मान्य नसावे.पत्रकारितेचे धडे गिरवण्याची मोठी संधी मला ‘मराठा’त मिळाली. ती संधी मिळण्यासाठी मला करावी लागलेली वाटचाल मुळीच सोपी नव्हती. पत्रकारितेचा पूर्वानुभव नसल्यामुळे मी ‘ट्रायल बेसिस’वर काम करावे असे मराठाचे मॅनेजिंग डायरेक्टर व्यंकटेश पै ह्यांनी मला सुचवले. खरे तर, मी महाविद्यालयात असतानाच माझे लिखाण ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘नवयुग’ दिवाळी अंक, ‘सोबत’, ‘हंस-मोहिनी’ इत्यादि नियतकालिकात प्रसिध्द झाले होते. स्मॉल कॉजेस कोर्टात मी तर्जुमाकार आणि दुभाषा पदावर काम करून माझ्या व्यावहारिक अनुभवातून तंटेबखेडे कसे उद्भवतात हे मला प्रत्यक्षच पाहायला मिळाले. पत्रकारितेच्या दृष्टीने हाही अनुभव मोलाचा होता. माझा  सगळा अनुभव बाजूला सारून ‘ट्रायल बेसिस’वर काम करण्याची पैसाहेबांची सूचना मी मान्य केली. कारण पत्रकारिता माझा ध्यास होता. माझ्या उमेदवारीस संपादकांची संमती मिळवण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला साहेबांकडे इंटरव्ह्यूला पाठवले.आचार्य अत्र्यांसमोर इंटरव्ह्यू देण्यासाठी उभे राहायच्या विचाराने माझी छाती दडपली गेली! मनाचा हिय्या करून मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. त्यांनी एकदोन जुजबी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची मी काय उत्तरे दिली हे माझे मलाही कळले नाही. मला म्हणाले, ठीक आहे. कामावर बसा!लगेच खाली उतरून पैसाहेबांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांना मी काही सांगण्यापूर्वीच ते म्हणाले, केव्हा तुम्ही येऊ शकाल? ‘ मी स्मॉल कॉजेस कोर्टात सर्व्हिसला आहे. तुमचं नेमणूक पत्र मिळाल्याखेरीज स्मॉल कॉजेस कोर्टात मला राजिनामा देता येणार नाही.’‘ठीक आहे. स्मॉल कॉजेस कोर्टातून सुटल्यानंतर संध्याकाळी येऊ शकाल?... ७ ते १२?’‘चालेल.’अशा प्रकारे पत्रकारितेत माझी उमेदवारी सुरू झाली. कुमाऊं भागात पाऊस अशा किरकोळ बातम्या मी पहिल्या दिवशी लिहल्या. ट्रायल काळातच हेडलाईनची बातमी लिहण्यापर्यंत माझी मजल गेली. बाळाराव सावरकर, आत्माराम सावंत आणि व. मा. देशपांडे ह्या तिन्ही चीफ सब एडिटरबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. बाळाराव सावरकरांनी तर ‘संस्थानिकांची तनखे हळुहळू कमी होणार’ ही मी लिहीलेल्या बातमीची हेडलाईन केली. नेमणूकपत्र मिळण्यापूर्वी हेडलाईनची बातमी मला मिळाली. मला नेमणुकीचे पत्र मिळणे ही केवळ औपचारिकता उरली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मला १ ऑगस्ट १९६८ पासून माझी उपसंपादकपदी नेमणूक करण्यात आल्याचे रीतसर पत्र मिळाले. त्यानंतर दुस-याच दिवशी मी जज्ज करंजेकर ह्यांची चेंबरमध्ये भेट घेऊन माझा राजिनामा सादर दिला. जज्ज करंजेकर ह्यांनीही शिताफीने माझा राजिनामा मंजूर केला. तो लागलीच रजिस्ट्राकडे पाठवला. शिताफीने म्हणायचे ते अशासाठी की मला कन्फर्म करण्याची शिफारस रजिस्ट्रार गावस्करांनी त्यांच्याकडे पाठवली होती. त्या पत्रावर सही न करता माझ्या राजिनाम्यावर त्यांनी आधी सही केली. शिफारसपत्रावर सही करून ते पत्र त्यांनी मुद्दाम विलंबाने रजिस्ट्रारकडे पाठवले.माझे, ग्रहयोग बदलले असावेत! सप्टेंबर महिन्यात मला ऑगस्ट महिन्याचे दोन पगार मिळाले. स्मॉल कॉजेस कोर्टाकडून आणि मराठाकडून! पगार मिळताच मी मर्फीचा ट्रँजिस्टर विकत घेतला. पत्रकार हा २४ तास पत्रकार असतो, असा धोशा त्या काळात सिनियर पत्रकार लावायचे. पत्रकाराला सकाळीच सगळ्या वर्तमानपत्रातल्या बातम्या तर माहित असायलाच पाहिजे; त्याशिवाय त्याने रेडियोवरील बातम्याही ऐकल्या पाहिजे असा एक निकष  पत्रकारांच्या बाबतीत त्या काळात लावला जात असे.माझ्या मनात वेगळीच खंत होती. महान नाटककार, नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक, आपल्या लेखणीच्या बळावर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करून ती यशस्वी करून दाखवणारा झुंजार पत्रकार आणि गाजलेला वक्ता असा संपादक असलेल्या वर्तमानपत्रात मी काम करत असूनही साहेबांचा माझा पहिल्या दोनतीन महिन्यात एकदाही संबंध आला नाही. चीफ सब एडिटर आणि रिपोर्टर्स मंडळींचा अत्रेसाहेबांचा संबंध येत असे. मी चीफसब एडिटर आणि रिपोर्टर ह्यापैकी कुणीच नव्हतो. त्या परिस्थितीत माझा साहेबांशी संबंध येण्याची सूतराम शक्यता नव्हती हेही मला समजत होते.कॉलेजमध्ये असताना थोरामोठ्यांच्या साहित्याचे वाचन केल्याने एक लक्षात आले होते की आयुष्यात आपण जे समजून चालतो तसेच घडते असे मुळीच नाही. एके दिवशी अत्रेसाहेबांशी संबंध येण्याची संधी अचानक माझ्याकडे चालत आली. त्या संधीतून पुढे खुद्द आचार्य अत्र्यांकडून पत्रकारितेचे धडे गिरवण्याचाही योग आला. पाटील-फर्नांडिस निवडणूक खटल्याच्या अपिलाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियात झळकली. ही बातमी आपल्याकडे का नाही, अशी पृच्छा साहेबांनी केली. संपादक खात्याने साहेबांना कळवले की पीटीआयने मुळातच ही बातमी आपल्याला दिली नाही. साहेबांनी लागलीच पीटीआयला फोन करून विचारणा केली. स्थानिक बातम्या सोडून जगभरातल्या बातम्या देण्याच्या कराराकडे पीटीआयच्या मॅनेजरने साहेबांचे लक्ष वेधले. लगेच युएनआयला फोन करून साहेबांनी ती बातमी देण्याची विनंती केली. युएनआयनेही ती बातमी उशिरा का होईना मराठाला पाठवण्याचे मान्य केले. सुनावणीची बातमी आपल्याकडे सविस्तर आली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या.माझा कोर्टातल्या नोकरीचा अनुभव लक्षात घेऊन ती बातमी मी चांगल्या प्रकारे करू शकेन असे संपादक खात्याने सर्वानुमते ठरवले. वृत्तसंपादक पिंगळे ह्यांनीही त्याला संमती दिली. कोर्टात साक्ष नोंदवण्याचे काम संपले की इंटरप्रिटरला काहीच काम नसायचे. इच्छा असेल तर बाहेर चक्कर मारायला जायचे किंवा युक्तिवाद ऐकत बसायचे! युक्तिवाद ऐकत बसण्याचा मला छंद जडला. न्यायालयीन युक्तिवादाची धाटणीही माझ्या आपोआप लक्षात येत गेली. अवचितपणे त्या युक्तिवाद ऐकण्याचा फायदा होण्याची वेळ आली. पाटील-फर्नांडिस खटल्याच्या अपिलाची सुनावणीच्या बातमीसाठी  मला कायम रात्रपाळी देण्यात आली.रोज संध्याकाळी ऑफिसला आल्यावर युएनआयचे क्रीड शिपाई मंडळी माझ्या हातात ठेवत. २०-२२ टेक वाचून बातमी करायची हे एक मोठे आव्हान होते. कॉलेजमध्ये असताना साहित्य विश्वातले अनेक वाद मी वाचलेले होते. त्यामुळे बातमी लिहताना वाक्यरचना करण्याची मला अडचण नव्हती. फक्त काही कठीण इंग्रजी शब्दांचा नेमका अर्थ मला कळत नव्हता! वेळेत काम पुरे होण्याच्या दृष्टीने पाच कॉप्या लिहून झाल्या की त्या कंपोजला पाठवायच्या असे मला चीफनी सुचवले. त्या काळात मराठात कंपोज झालेल्या मजकुराचे तीन प्रूफे निघत. एक प्रत प्रुफ रीडरला, दुलरी प्रत चीफसबकडे आणि एक प्रत थेट साहेबांकडे!दुस-याच दिवशी साहेबांचा शिपाई घाडी मला बोलवायला आला. तुम्हाला साहेबांनी बोलावलंय्. माझ्या सहका-यांनी तर माझ्याकडे अशा नजरेने पाहिले की जणू काही मी वधस्तंभाकडे निघालोय्! त्यांच्या नजरेने मी अधिकच घाबरून गेलो. आपल्या हातून अशीच भयंकर मोठी चूक झाली असली पाहिजे. आता नोकरी गेल्यात जमा आहे असे मला वाटू लागले. भेदरलेल्या अवस्थेत मी साहेबांसमोर उभा राहिलो.‘तुम्हाला इंग्रजी येतं का?’त्यांच्या ह्या प्रश्नाने मी आणखीच घाबरून गेलो. इंग्रजी येतं असं म्हणावे तरी पंचाईत आणि येत नाही असं म्हणावं तरी पंचाईत! परंतु त्यांना माझ्याकडून उत्तर अपेक्षित नव्हते.  दुस-या क्षणी ते म्हणाले, हे बघा मराठीत लिहताना नेहमी डौलदार मराठीत लिहलं पाहिजे. मी लिहलेल्या एका वाक्यावर खूण करून त्यांनी मजकुराच्या बाजूला असलेल्या जागेवर तेच वाक्य त्यांनी पेनने लिहले. माझ्या बातमीतील अनेक वाक्ये त्यांनी रिराईट केली. ती वाक्यं त्यांनी मला मोठ्याने वाचायला लावली.‘आता समजला न फरक?’माझ्या नशिबाने त्यांच्यातला शिक्षक जागा झाला. ते म्हणाले, ‘आपण लिहलेलं वाक्य मोठ्याने वाचून पाहायचं. ते कसं लिहलं गेलंय हे आपल्याला लगेच समजतं.’त्याक्षणी माझ्यातली भीती पळून गेली. एका जातिवंत शिक्षकाकडून, उत्कृष्ठ दिग्दर्शकाकडून आपण धडे घेतोय ह्या आनंदाने मी मोहरून गेलो. मोहरलेल्या अवस्थेतच मी खाली आलो. सगळ्यांचा एकच सूर होता, साहेब माझ्यावर भडकले असणार! वस्तुस्थिती मात्र वेगळीच होती. तुम्हाला इंग्रजी येतं का, असा प्रश्न साहेबांनी मला विचारल्याचे मी पुष्पा त्रिलोकेकरांना सांगताच त्या म्हणाल्या, हा प्रश्न साहेबांनी प्रत्येकाला विचारला आहे. मात्र, प्रश्नाचे उत्तर त्यांना अजिबात अपेक्षित नसते. ते रागवतात. थोड्या वेळाने शांतही होतात असं पुष्पाने सांगताच माझ्या जिवात जीव आला! तीनचार वेळा त्यांनी मला वर बोलावून घेतले आणि प्रत्येक वेळी त्यांनी क्रीडमधल्या मूळ इंग्रजी वाक्याचे मराठी रूपान्तर कसे करावे हे नीट समजावून सांगितले.झुंजार पत्रकार अशी आचार्य अत्र्यांची महाराष्ट्रात प्रतिमा होती. श्रोत्यात हास्याचे धबधबे निर्माण करणारी भाषणे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व ह्यामुळे महाराष्ट्र भारावून गेला होता. परंतु माझ्या दृष्टीने जर्नालिस्ट क्राफ्ट शिकवणारे ते महान संपादक होते. नाशिकला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी नवयुगसाठी केलेले रिपोर्टिग नंतर मला वाचायला मिळाले. तो रिपोर्ट वाचल्यानंतर ते एक मातब्बर रिपोर्टरही आहेत अशी माझी खात्री पटली. नंतर मला अधुनमधून सांजला ड्युटी मिळायची त्या ड्युटीत अनेकदा बातम्या लिहून घेण्यासाठी बोलावणे यायचे. ब-याचदा टाईम्स ऑफ इंडियातील बातम्या स्वतः भाषान्तर करून खाली पाठवत असत. टाईम्य आणि नवाकाळ हे त्यांच्या आवडीची वर्तमानपत्रं होती. सकाळी उठल्याबरोबर ती वर्तमानपत्रे ते वाचायला घेत. अखेरच्या आजारापर्यंत त्यांचा हा नित्यक्रम होता. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले त्या दिवसापर्यंत हा क्रम सुरू होता. त्यांना वाचवण्यासाठी ब्लड ट्रान्सफ्युजनचा डॉक्टरांनी प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही.त्यांचे शव शिवशक्तीत दर्शनासाठी ठेवण्यात आले तेव्हा मराठाच्या संपादक मंडळींनी त्यांच्या पायावर मराठाचा ताजा अंक ठेऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. दिवसभर अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागलेली होती, त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाचे नाव मराठाच्या बातमीत आले पाहिचे असे ठरले. अंत्यदर्शन आणि सांत्वनासाठी आलेल्यांची नावे टिपण्यासाठी आम्ही सर्वांनी आळीपाळीने दोन दोन तासांची ड्युटी लावून घेतली. दोन तासांची ड्युटी करताना माझी पंचाईत झाली. कारण अनेकांना मी प्रत्यक्ष ओळखत नव्हतो. तेव्हा, सरळ त्यांचे नाव विचारून घेण्याचे मी ठरवले. एकेक नाव ऐकताना ती नावे मी अनेक वेळा बातम्यत लिहली असल्याचे माझ्या लक्षात आले! संपादक खात्यात आलेला एक फोन मी घेतला. लाईनवर पोलिस कमिश्नर होते. त्यांना अंत्ययात्रेचा रूट हवा होता, मला ही तो माहित नसल्यामुळे मी तुम्हाला फोन करून कळवतो असे सांगून फोन बंद केला. पुढे रूट कळवण्याचा निरोप मी वरिष्ठांना दिला.संपादक खात्याच्या कामात महिन्यातून एकदा पैसाहेबांच्या केबिनमध्ये संपादक खात्याच्या सभाससदांची मिटींग हेही एक काम होते. त्या मिटींगची आम्ही सगळे उत्सुकतेने वाट पाहात असू. कारण मिटींगमध्ये कोणाचीही फिरकी घेण्याचे स्वातंत्र्य होते. त्या मिटींगमध्ये पैसाहेब सगळ्यांचे मार्मिक निरीक्षणही नोंदवत. एकदा संपादक खात्यातल्या प्रत्येकाच्या राजकीय मतांचा विषय निघाला. माझ्याबद्दल कोणी काही बोलण्याच्या आधीच पैसाहेब म्हणाले, ही इज लेफ्ट टू दि सेंटर!आचार्य अत्र्यांचा मृत्यूपूर्वी मी माझ्या आजोबांचा मृत्यू पाहिला होता. पण आचार्य अत्र्यांसारख्या महापुरूषाचा मृत्यू आणि त्यांच्या मृत्यूनंतर उसळेला शोककल्लोळ पाहण्याचा माझा आयुष्यातला पहिलाच प्रसंग. आज तेरा जून उजाडला तेव्हा मराठातल्या दिवसांच्या आठवणींनी माझ्या मनात गर्दी केली. ती मी लेखनबध्द करत आहे. अत्रेसाहेबांना आदरांजली रमेश झवरज्येष्ठ पत्रकार
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!