अडली माय, करते काय.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

आता एकसुद्धा नवीन खेळणं आणणार नाही तुला!! दोन दिवसाचं कौतुक नुसतं, नंतर बघत पण नाहीस त्याच्याकडे. काय करायचं एवढ्या खेळण्यांच सांग? तू तर फक्त माझ्या मागेमागेच करतोस. खेळ ना एका जागी बसून जरा त्या खेळण्यांनी, पृथा आपल्या सहा वर्षांच्या वेदवर वैतागून ओरडली.तसा वेद म्हणाला, मला नाही आवडत एकट्याने खेळायला. तू पण खेळ माझ्याशी.अरे, मी तुझ्याशी खेळत बसणार तर माझी कामं कधी करणार? नुसतं खेळत राहून आपल्याला कोण खायला प्यायला देणार आहे का?, पृथा आणखी जरा खेकसून बोलली. तास झाला तरी वेद तिला सोडायचं नाव घेत नव्हता. नुसतं खेळ खेळ चालू होतं त्याचं. आणि पृथाला समोर कामाचा डोंगर दिसत होता. आता कधी एकदा हा सोडतोय आणि कामाला लागतेय असं झालेलं तिला.ती पुन्हा त्याला म्हणाली, चल हा शेवटचा डाव, मला कुकर लावायचाय. पटकन आवर.वेद म्हणाला, ठिक आहे मग मला मोबाईल देऊन जा. काही नाही मिळणार मोबाईल मुकाट्याने खेळ त्या खेळण्यांनी .......पृथाने त्याला दटावलं.त्यावर वेद पटकन म्हणाला, मग माझे मित्र आणून दे. मला त्यांच्याबरोबर आवडतं खेळायला. ते आले की खेळण्यांनी खेळायला पण मजा येते.दे आणून, नाहीतर मग तूच खेळ माझ्याशी.वेद उगीच ब्लॅकमेल करू नकोस हं. मी चालले आत, असं म्हणून पृथा उठली, आणि स्वयंपाकघरात गेली.तिला तिथलं चित्र बघूनच कळेना नक्की सुरुवात कुठून करावी. तसं रोजचंच होतं, हे नवरा कामाला गेला की दहा पंधरा मिनिटांनी लगेच वेद उठून बसायचा. त्याचं आवरण्यात, त्याला खायला प्यायला देण्यात सगळा वेळ भुर्रकन उडून जायचा. आणि ते सर्व झालं की त्याला तिच्याशी खेळायचं असायचं. तिलाही वाटायचं, एकटाच पडलाय सध्या, थोडं खेळूया. पण त्याचं थोडं खेळणं संपायचच नाही. ढिगाणी खेळणी असूनही त्याला त्याच्या आईशीच खेळायला हवं असायचं. निर्जीव खेळण्यात त्याचं मन जास्त रमायचंच नाही. अन् त्याने अडवून धरलं की पृथाची सगळी कामं राहून जायची. पण वेळच अशी आली होती की पर्याय नव्हताच काही दुसरा. आणि वैताग करून तरी काय होणार होतं? प्रत्येकजण लढतच होतं. कोणी बाहेर कोणी आत. तिने पटकन पसारा आवरला, कुकर लावला आणि शिट्या होईपर्यंत वेद एवढ्या वेळ गप्प कसा बसलाय ते डोकावयाला गेली.बघते तर वेदने सगळी खेळणी जमिनीवर, बेडवर पसरवून टाकलेली, ते बघून तिला पहिले त्याला जोरात ओरडावसं वाटलं, पण तरी संयम बाळगून ती म्हणाली, काय पसारा मांडलास रे सगळा? आता कोण भरणार हा? एक- दोन काढायची आणि खेळायचं ना. सगळीच्या सगळी का काढलीस?वेद म्हणाला, तूच म्हणतेस ना नेहमी, मी देऊन टाकते खेळणी कोणाला. जा देऊन टाक. मला नाही खेळायचय कशानी........मला कंटाळा आलाय या सगळ्यांचा. जा देऊन टाक सगळी. मग खेळशील ना तू माझ्याशी. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); पृथाला तर रडायलाच आलं, वाटलं; आता काय करायचं ह्याचं?तिने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, मी खेळतेच ना रे तुझ्याशी. पण किती खेळू? तू पण एकटं खेळायला हवं ना? थोड्या वेळ तरी!!भातू लागतो ना तुला खायला, मग तो नको का लावायला? ताटही लागतं ना जेवायला, भांडं लागतं पाणी प्यायला, तुझ्याशी खेळत बसले तर हे सगळं जादूने होणार का सांग?आपल्या मावशी नाही येऊ शकत ना आता, म्हणून रे!! मग तिला पट्कन काहीतरी सुचलं, आणि ती म्हणाली, तू मला मदत करशील का, कामं करायला म्हणजे माझं पटकन आवरेल, आणि आपण पुन्हा खेळू.वेद म्हणाला, तू ओरडतेस. स्वैपाकघरात आलं की. इकडे नको हात लावू तिकडे नको हात लावू करतेस.हो, ते मी तू एकाची दोन काम करू नये म्हणून बोलते. पण मग तुला एकटं वाटतं ना?मी तुला टास्क देत जाईन एकेक, तू करशील का?, पृथाने विचारलं तसा वेद आनंदून म्हणाला, हो चालेल. मला मज्जा येईल. मग आता जेऊया नंतर मी भांडी घासेन तेव्हा जरा तू मला तांदूळ भरून देशील का डब्यात?होsss मग नंतर मी कचरा काढेन तेव्हा तू बेडवर बसून बरण्यात डाळी भरशील का? केव्हाचं राहिलंय माझं.......ये तो मेरे बाये हात का खेल है मम्मी!!पृथाला तर हसायलाच आलं, कधी झाला रे बाये हात का खेल? कार्टून कॅरेक्टर आलं का अंगात?आणखीन काय करू सांग ना?, वेदला मम्मी आपल्याला कामं देतीये, याचाच खूप आनंद झाला होता.आणखीन...... आपण कपड्याच्या घड्या घालूया. तू छोट्या छोट्या कपड्यांच्या घाल, मी मोठ्या घालेन. आणि मग तू ते एकेकाच्या कप्प्यात ठेव. चालेल?आणखी?मग तू मला भांडी पुसून दे, आणि मी ती जागेवर लावीन. पण तू कामं करून थकला नसशील तरच हं!!आणखी? मी नाही थकणार!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); आणखी बास झालं.........आज एवढं करूया, आता रोजच दोघांनी मिळून करायची आहेत ना कामं, मग आपली कामं पटकन होतील आणि खेळायला भरपूर वेळ मिळेल.दोघांची मांडवली झाली आणि जेवून दोघही कामाला लागली सुद्धा!!पण जसं आखलं तसंच अगदी घडलं नाही खरंतर.......वेदला तांदूळ भरायला दिले, त्यातले उत्साहाच्या भरात त्याच्याकडून सांडलेही गेले. पृथाचा भांडी घासता घासता जीव खालीवर होत होताच, पण किमान ती सुखाने घासायला मिळतायत म्हणून तिकडे दुर्लक्ष करणं तिला भागच होतं. तरी मनात चाललच होतं, आता या पोराने जास्त नको उद्योगाला लावायला...... डाळी भरताना वेदकडून थोडा घोळ होऊन त्या एकमेकात समरसूनही गेल्या, पण कचरा काढताना तो मधेच उड्या मारत नाहीये, एवढ्या समाधानावर तिने ते दुःखही सोसलं.कपड्याच्या घड्या घालताना कुणी कुठले कपडे घडी घालायचे यावरून वाद विवाद घालण्यात दहा मिनिटं अशीच गेली. वेदला दोनच लहान कपडयाच्या घड्या करून फुल कॉन्फिडन्स आला, आणि त्याने तो मोठ्या कपड्यांच्या घड्या घालणार आणि तू लहान असा आदेश काढला.भांडी पुसून देताना त्यातली काही चुकून वेदच्या हातून निसटून त्यांना पोचेही पडले.पण पृथाला त्याच्याकडे प्रेमाने बघण्याशिवाय इलाजच नव्हता.......वेदचा टाईमपास तर झाला, तो खूषही झाला,पृथानेही प्रोत्साहन म्हणून त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं. ते पाहून वेदला आणखी जोश चढला, मी रोजच हे सर्व करणार, अशी त्याने अत्यानंदाने  घोषणा केली........पृथाने होकारदर्शक मान हलवली, मात्र मनात म्हणाली; अडली माय, आता करते काय????©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!